मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रावर कोसळलेल्या महापुराच्या महाआपत्तीत सारं काही हिरावले गेलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मदतीसाठी आता राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. मुंबईतील राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर आहेत. जमात इस्लामीनेही आपले कार्यकर्ते पूरग्रस्त भागात पाठवले आहेत.
महाड इथे पुरामुळे अतिशय हानी झाली आहे. तिथल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी या समितीचे मुंबईचे ५० स्वयंसेवक तिथं कार्यरत आहेत. उद्योग आयुक्त डॉ हर्षदीप कांबळेंच्या मार्गदर्शनाखाली महाड इथे मदतकार्यात सहभागी झाले आहे.
महाड शहराला तसेच आजूबाजूच्या ७ ते ८ गावांना पुन्हा उभे राहण्यासाठी समितिचे ५० स्वंयसेवक चार ते पाच दिवस मदत करणार आहेत. त्यांनी सोबत ५ टन तांदूळ, डाळी, ४० हजार पॉकेट्स बिस्किटे, बिस्लरी पाणी,) स्त्रियांसाठी दीड हजार साड्या व मॅक्सी, झोपण्यासाठी एक हजार चटई, एक हजार टी शर्ट यांचे वाटप करण्यात येईल. तसेच त्या ठिकाणी स्वयंसेवक गाळ, चिखल काढण्याचे काम सुद्धा करणार आहेत.
जमाते इस्लामीही सरसावली!
जमात ए इस्लामी हिंद संघटनेच्या पुसद शाखेतर्फे कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. मुहम्मद मुद्स्सीर, सय्यद सलीम, मुहम्मद सलमान व अब्दुल मोहित हे युथ विंग आणि आयआरडब्ल्यू चे ४ कार्यकर्ते कोकणात मदतकार्यासाठी पुसद येथून आज निघाले आहेत. त्यांनी आपल्यासोबत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत साहित्याचे किट घेतले आहेत. ते किट पूरग्रस्त गरजूंना देण्यात येणार आहेत.