मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते देशभर कडवट हिंदुत्ववादी भूमिकेतून गोमांस खाण्यास विरोध करत असताना, काही राज्यांमधील स्थानिक जनमत लक्षात घेत गोमांस समर्थनाची वेगळी टोकाची भूमिकाही घेताना दिसत आहे. मेघालय सरकारमधील भाजपा मंत्री सानबोर शुलाई यांनी राज्यातील लोकांना चिकन, मटण आणि माशांपेक्षा अधिक गोमांस खाण्याचे आवाहन करत आहेत.
गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते शुलाई म्हणाले की, लोकशाही देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे पाहिजे तो ते खाऊ शकतो.
मंत्री भाजपाचा, गोमांस भक्षणाचा पुरस्कर्ता!
- मी लोकांना चिकन, मटण किंवा माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्यास प्रोत्साहित करतो.
- लोकांना अधिक गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास भाजप गोहत्येवर बंदी घालेल हा गैरसमज दूर होईल.
- ते आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याशी बोलून मेघालयातील गुरांच्या वाहतुकीवर शेजारच्या राज्यातील गायींच्या नवीन कायद्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
आसाममध्ये गुरांच्या संरक्षणासाठी कायदा आला आहे, ज्याचे नाव आसाम गाय संरक्षण विधेयक, २०२१ आहे. शेजारील बांग्लादेशात गाईंची तस्करी नियंत्रित करण्यासाठी आसाममधून गायींच्या आंतरराष्ट्रीय निर्यातीवर बंदी घालणे हा या कायद्याचा उद्देश आहे.
राज्य सीमा रक्षणाची भूमिका!
त्याचवेळी, मेघालय आणि आसाममधील गुंतागुंतीच्या सीमा वादावर, तीन वेळा आमदार शुलाय म्हणाले की, आता वेळ आली आहे की राज्य आपल्या पोलीस दलाचा वापर आपल्या सीमा आणि लोकांच्या संरक्षणासाठी करेल. “जर आसामच्या लोकांनी सीमावर्ती भागात आमच्या लोकांना त्रास देणे सुरू ठेवले, तर आता फक्त बोलण्याची आणि चहा पिण्याची वेळ नाही … आम्हाला उत्तर द्यावे लागेल, आम्हाला जागेवरच काम करावे लागेल,” असे ते म्हणाले. मात्र, आपण हिंसाचाराचे समर्थक नसल्याचे त्यांनी सांगितले.
आसाममध्ये भाजपाच सत्तेत, तरी संघर्षाची भूमिका!
ते म्हणाले की, आपल्या लोकांचे रक्षण करण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे, आपण आपल्या बळाचा वापर केला पाहिजे, मिझोराम पोलिसांनी आघाडीवर जाऊन आसाम पोलिसांशी बोलले पाहिजे. यापूर्वी कछार जिल्ह्यातील लैलापूर येथे आसाम आणि मिझोराम पोलीस दलांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. ज्यामध्ये आसामचे ५ पोलीस कर्मचारी आणि १ रहिवासी ठार झाले होते. तर ५० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी धोलाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.