मुक्तपीठ टीम
पहिल्या दिवशी सातारचा दौरा आटोपून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. शिरोळ तालुक्यातील मदतसामुग्रीचे वाटप करीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
सांगली जिल्ह्यात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संजय पाटील, सदाभाऊ खोत, पृथ्वीराजबाबा देशमुख हे तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, राजे समरजित सिंह घाटगे हे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील दौऱ्याचा प्रारंभ वाळवा ग्रामपंचायतीला भेट देऊन झाला. येथे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारले. विविध समस्या जाणून घेतल्या. या समस्यांबाबत निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, असे अभिवचन दिले.
वाळवा गावातील विविध ठिकाणांना सुद्धा त्यांनी भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही घराची पडझड झाली आहे. शेती आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान आहे. मनुष्यहानी टळली, हेच सुदैव. ७० एकर जागेत पुनर्वसन करण्यात यावे अशा स्थानिकांच्या मागण्या आहेत. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये येथे पूर आला तेव्हा तातडीने रोखीची मदत देण्यात आली होती. नवीन घर तर दिलेच. पण तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या घरात राहावे लागले, तेव्हा घरभड्याचे पैसे सुद्धा दिले होते, असे सांगताना त्यांनी आज या गावाला भेट देऊन पूरपिडितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दुर्दैवाने दोन वर्षांनी पुन्हा तेच संकट आले आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारकडून पैसे मिळतच असतात. पण राज्य सरकारने अशावेळी निकषाबाहेर जाऊन ठोस मदत तातडीने करायची असते. गेल्यावेळी पंचनामे झाले नाही तर मोबाईलने काढलेला फोटो हा पुरावा मानावा, असा निर्णय आपण केला होता, आताही तसाच निर्णय व्हावा, अशी आमची मागणी आहे. बारा बलुतेदारांच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. राज्य सरकारकडून मदत मिळण्यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करू.
भिलवडी बाजारपेठेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. नागरिकांची निवेदने स्वीकारली आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला. २०१९ मध्ये पुराच्यावेळी विशेष निर्णय आपल्या सरकारने घेतले. शेती, जनावर यासाठी मदत केली आणि दुकानदारांना सुद्धा पैसे मिळाले. आज येथे पाहणी केली तेव्हा अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. आजही लोक दुकानातून चिखल काढताना दिसत आहेत.
अशाप्रसंगी सरसगट नुकसान गृहीत धरावे लागेल, त्यामुळे सर्वांना मदत मिळणे शक्य होते. सर्व घटकांना या नुकसानीची मदत मिळेल, यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. भविष्यात अडचणी निर्माण होणार नाही, यासाठी पुलाची उंची वाढविणे यासारखे अनेक उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील ढवळी येथे त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. मोठ्या प्रमाणात शेती, घर, विजेचे नुकसान झाले आहे. गावातील सर्वांनी चांगली मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकारकडून अजूनही मदतीची घोषणा होत नाही, पण आता लवकर घोषणा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
सांगलीतील जामवाडी, मगरमच्छ कॉलनी, बालाजी चौक, मारुती चौक, हरिपूर रोड, हरिपूर ग्रामपंचायत, श्यामनगर या भागांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्या, नागरिकांशी चर्चा केली. प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा लोक घरातून चिखल, पाणी काढत होते. बाजारपेठांमध्ये दुकानांचे मोठे नुकसान झाले. जामवाडी येथे सुमारे ३००-४०० कुटुंब पीडित आहेत. या सर्व भागात तातडीने मदत करण्याची गरज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे श्री पद्मराजे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे भाजपा आणि भाजयुमो, तसेच कॅप्टन तमिल सेल्वन यांच्या मदतसामुग्रीचे त्यांनी वितरण केले तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.
संभाजी पवार यांच्या कुटुंबीयांची भेट माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. सांगली दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.