मुंबई : अनेक रुग्णांसाठी जीवनदायी असलेल्या भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाचा विस्तार करीत असताना याबाबतचा परिपूर्ण आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.
जे.जे.रुग्णालय विस्तारीत इमारतीच्या आराखडयासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह हेल्थ ब्रिजचे ॲडव्हायझर शैलेश गद्रे उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, जे. जे. रुग्णालय अतिविशेषोपचार रुग्णालयात रुपांतरीत करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या आवारातच दहा मजली अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या अत्याधुनिक रुग्णालयामुळे रुग्णांना एकाच इमारतीमध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. अतिविशेषोपचार रुग्णालय उभारणीसंदर्भातील कामांची आखणी होणे आवश्यक आहे.