मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने भारतातील ११ शहरांना सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहरे म्हणून मानाचा किताब प्रदान केला आहे. यामुळे ‘इंडिया सायकल्स ४ चेंज’ स्पर्धेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली असून यात देशातील १०७ शहरे विविध सायकलिंग-स्नेही उपक्रमांसंदर्भातील चाचण्या, शिक्षण श्रेणीबद्धतेसाठी एकत्र येऊन भारताच्या सायकलिंग क्रांतीपर्वाची सुरुवात करतील. या वर्षीच्या सुरुवातीला चाळणी फेऱ्यांनंतर ज्या २५ शहरांची यादी निश्चित करण्यात आली त्यापैकी सर्वोत्तम ११ शहरांची निवड वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तज्ञांनी केली. या अकरा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश आहे. तसेच औरंगाबादचाही परीक्षकांनी खास उल्लेख केला आहे.
या शहरांना त्यांच्या क्षेत्रातील सायकलिंगला प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु करण्यासाठी १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. परीक्षकांनी मूल्यमापन केलेल्या सर्वोत्तम २५ शहरांची यादी परिशिष्ट १ मध्ये दिली आहे.
२८ जुलै २०२१ला झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात, केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी विजेत्या ११ सर्वोत्तम शहरांची नावे जाहीर केली. यावेळी स्पर्धेच्या पहिल्या आव्हान टप्प्याचा अहवाल आणि विविध शहरांच्या सायकलिंग बद्दलच्या प्रवासाची माहिती देणाऱ्या ऑनलाईन प्रदर्शनाचे प्रकाशन करण्यात आले. या स्पर्धेची दुसरा टप्पा ऑगस्ट महिन्यात सुरु होत असल्याची घोषणा देखील मंत्रालयाने केली. या फेरीत सर्व स्मार्ट शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीची शहरे तसेच ५ लाखांहून जास्त लोकसंख्या असलेली शहरे यांच्याकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पहिल्या आव्हान टप्प्याचा अहवाल
‘इंडिया सायकल्स ४ चेंज’ स्पर्धेचा ‘भारतातील सायकलिंग क्रांतीची पहाट’ असे नाव असलेला पहिला अहवाल जनतेसाठी प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये शहरांनी यासंदर्भात गाठलेले महत्त्वाचे टप्पे, प्रत्यक्ष चाचण्यांतून शिकलेले धडे आणि आगामी वर्षासाठीच्या त्यांच्या योजना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
हा अहवाल https://smartnet.niua.org/indiacyclechallenge/ येथे उपलब्ध आहे.
ऑनलाईन प्रदर्शनाची सुरुवात
गेल्या वर्षभरात भारतात झालेल्या सायकलिंग विषयक क्रांतीचा उत्सव साजरा करत, मंत्रालयाने देशातील सायकलिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या २५ शहरांच्या प्रवासाचे वर्णन करणारे ऑनलाईन प्रदर्शन सुरु केले आहे.
हे प्रदर्शन https://smartnet.niua.org/indiacyclechallenge/online-exhibition-overview/ येथे पाहता येईल.
भविष्यातील मार्गक्रमण
मंत्रालयाने ‘इंडिया सायकल्स ४ चेंज’ स्पर्धेच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. या भागात ऑगस्ट, २०२१ मध्ये नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
“२०२० या वर्षाने भारतातील सायकलिंग क्रांतीला चेतना दिली. सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शहरे आणि नागरिकांनी एकत्र येऊन चाचणी, शिक्षण आणि दर्जा सुधारण्यासाठीच्या कल्पनांवर काम केले. अधिकाधिक शहरांनी सायकलिंग क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी आणि सायकलिंग-स्नेही भविष्याच्या दिशेने काम करण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देतो.”
– केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा
‘इंडिया सायकल्स ४ चेंज’ स्पर्धेने शहरांना फक्त सायकलिंगसाठी परिवर्तीत केले आहे असे नव्हे तर देशभरातील शहरांमध्ये सायकलिंगमध्ये प्रवीण असणाऱ्या खेळाडूंचा समुदाय निर्माण करण्यासाठी मदत केली आहे.
-केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट शहरे अभियानाचे संयुक्त सचिव आणि अभियान संचालक कुणाल कुमार
“सायकलिंगसाठी मार्ग तयार करा, त्यामुळे सायकलिंग करणारे आपोआप येतील. शहरांनी आता सायकलिंग करणे सुरक्षित आणि प्रत्येकासाठी आनंददायी होण्यासाठी नवीन सुविधांची सुरुवात करून सुधारणा केल्या पाहिजेत.”
-श्रेया गाडेपाटील आयटीडीपी संस्थेच्या आग्नेय आशिया कार्यक्रम प्रमुख
भारतातील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम शहरे (अक्षरांच्या क्रमानुसार)
११ सर्वोत्तम पारितोषिक विजेते
- बेंगळूरू (कर्नाटक)
- भुवनेश्वर (ओदिशा)
- चंदीगड (पंजाब आणि हरियाणा)
- कोहिमा (नागलँड)
- नागपूर (महाराष्ट्र)
- न्यू टाऊन (पश्चिम बंगाल)
- पिंपरी चिंचवड(महाराष्ट्र)
- राजकोट (गुजरात)
- सुरत (गुजरात)
- वडोदरा (गुजरात)
- वारंगळ (तेलंगणा)
- परीक्षकांची विशेष टिप्पणी
- औरंगाबाद(महाराष्ट्र)
- गुरगाव (हरियाणा)
- जबलपूर (मध्य प्रदेश)
- सिल्व्हासा (दादरा आणि नगर हवेली)
- महाराष्ट्रातील सर्वोतम पारितोषिक विजेते
नागपूर
सायकलिंग करण्यासाठी लोकांचे मन कसे वळवावे?
त्यांना काय पाहिजे आहे ते ऐकून घ्या.
कोणत्याही प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचे म्हणणे ऐकल्याने काय घडते याचे चमकदार उदाहरण म्हणजे नागपूर. सायकलिंग बद्दल केलेल्या सर्वेक्षणामध्ये १५ हजारांच्या मोठ्या संख्येने लोकांनी भाग घेऊन प्रतिक्रिया नोंदवल्या आणि सायकलिंग करण्यातील त्यांच्या अडचणी अधोरेखित केल्या. त्यांच्या प्रतिसादाने शहरातील रस्त्यांवर सायकल वापरणे सुलभ करण्याच्या दृष्टीने शहराचे नियोजन करता आले. तयार झालेली योजना घेऊन नगर प्रशासन पुन्हा लोकांकडे गेले आणि रहिवासी कल्याण संघटनांच्या सहकार्याने काम करून या योजनांची चाचणी घेण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यामुळे जेव्हा या योजनांची प्रत्यक्ष प्रायोगिक चाचणी झाली तेव्हा नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि प्रतिक्रिया दिल्या. आता त्यावरून शहरात आणखी सुधारणा करण्याचे नियोजन सुरु आहे.
पिंपरी चिंचवड
संपूर्ण शहरात हरित सायकलिंगचे जाळे उभारले तर काय होईल?
पिंपरी चिंचवड प्रशासनाने शहरातील खुल्या जागांना जोडणारे सायकलचे मार्ग तपासले. या तपासणीच्या यशावर आधारित आणि नागरिक, स्थानिक सीएसओ तसेच तज्ञांच्या सूचनांनुसार हरित सेतू मास्टरप्लॅनची निर्मिती करण्यात आली.यामध्ये शहरातील सर्व हरित जागांना जोडणाऱ्या सायकलिंग मार्गाची संकल्पना मांडण्यात आली आहे. ही योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.
“कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाच्या केंद्रस्थानी जनता असते. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी ‘इंडिया सायकल्स ४ चेंज’ स्पर्धेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या उपक्रमासाठी दिलेल्या प्रतिसादाने पिंपरी चिंचवडचे भविष्य शाश्वत आहे असा विश्वास मला वाटतो.
उषा उर्फ माई धोत्रे, पिंपरी चिंचवडच्या महापौर परीक्षकांची विशेष टिप्पणी
औरंगाबाद
जुन्याचे विस्मरण न करता आपण नवीन रचना कशी करू शकतो?
याचे उत्तर ‘औरंगाबाद’ असे आहे.
या शहराने दुचाकीवरून भूतकाळाची फेरी मारली. ‘इंडिया सायकल्स ४ चेंज’ अभियानात प्रशासनाने लोकांना सायकली चालविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आणि शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या भेटीची योजना आखली. अगदी सायकलिंगसाठी निर्माण केलेल्या मार्गांवर देखील ‘जुन्या गोष्टींना नवजीवन देण्या’ची संकल्पना राबविली गेली. वापरलेले टायर आणि दिव्यांचे खांब यांना जोडत जाऊन सायकल चालविण्यासाठी मार्ग आखून घेतले. आता या शहरातील सर्व ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे जोडणारा सायकल मार्ग निर्माण करण्याचे नियोजन प्रशासन करत आहे.
सायकलिंग मधील उपक्रम हाती घेणारी इतर उल्लेखनीय शहरे
नाशिक
बदल घडवून आणण्यासाठी माहितीचा वापर कसा करावा?
नाशिक शहराने माहितीच्या आधारावर निर्णय घेण्याचा दृष्टीकोन स्वीकारला. पहिले काम म्हणजे त्यांनी औद्योगिक कामगार, विद्यार्थी, पर्यटक अशा विविध विकेंद्रीत गटांबाबतीत सायकल मार्गांची धोरणात्मक तपासणी होण्यासाठी जास्त वापरल्या जाणाऱ्या सायकल मार्गांचे विश्लेषण केले. दुसरे म्हणजे निश्चित केलेल्या ठिकाणी दिवसाच्या विविध वेळी असलेल्या लोकांचे तपशीलवार विश्लेषण करून जास्त त्रासदायक समस्या ठरविल्या. आणि तिसरे म्हणजे त्यांनी सायकलिंग करणाऱ्या लीकांच्या वाढत्या संख्येबाबत आकडेवारी गोळा केली आणि इतरांना सायकलिंग करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ही आकडेवारी शहरात दर्शनी भागी जाहीर केली. आता, आधीच्या प्रायोगिक तत्वावरील योजनेतून बोध घेऊन हे शहर १०० किमी च्या रस्त्याची पुनर्रचना करण्याची योजना आखत आहे.
पणजी
सायकलिंग एखाद्या स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून पुन्हा नावारूपाला कसे आणू शकेल?
पणजी शहराकडे यासाठी एक कल्पना आहे.
पणजी शहराला भेट देऊन त्यातील विलक्षण गोयंकरी परिसर, मांडवी नदीच्या चमकत्या प्रवाहाचा देखावा पाहत सायकलिंग करण्याची कल्पना करा. आणि अचानकपणे, खुला विस्तृत समुद्र तुमच्यासमोर येतो. पणजी शहराचा अनुभव घेण्यासाठी फिरणाऱ्या पर्यटकांचा विचार करून प्रायोगिक तत्वावरील सायकलिंग मार्ग तयार करताना प्रशासनाच्या डोळ्यासमोर हेच चित्र होते. आता, नियमितपणे सायकल शर्यतींचे आयोजन करून आणि ऐतिहासिक वारसा असलेले मार्ग सायकलिंग करण्यासाठी जुन्या शैलीत सजवून सायकलिंग करीत या परिसरात फिरणे आनंददायी करण्यासाठी शहर प्रशासन नियोजन करत आहे.