मुक्तपीठ टीम
नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे – तुरे’ चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील लघूउद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यावेळी तेथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. पण त्यांनीही राणेंना रोखले नव्हते. त्यामुळे भाजपाच्या मूळच्या नेत्यांनीही खासगीत नापसंती व्यक्त केली होती. अजित पवारांनी नाव न घेता भाजपा नेत्यांना आज जाहीररीत्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली आहे.
मुख्यमंत्री एखादी पाहणी करण्यासाठी जातात त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात. मग कुणीही मुख्यमंत्री असेल तर तसंच होणार. नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात असा मोलाचा सल्लाही अजित पवार यांनी भाजपला यावेळी दिला.
पाच वर्षे सत्तेत नसताना संकट आल्यावर आम्ही जात होतो त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाही… प्रांत कुठे गेला…मामलेदार कुठे आहे असं कधीही म्हटलं नाही किंवा विचारले नाही. अरे तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलात असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला आहे.
चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली तेव्हापासून मोठमोठे लोक राज्याचे प्रमुख झाले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदराव पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला तर कधीही अशापध्दतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्याकाळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते याची आठवणही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला करुन दिली.
मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना राणेंचा तोल गेला
- चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नाराण राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
- त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांच्यावर आगपाखड केली.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा भलताच तोल गेला.
- नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत.”
- आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका.
- प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे.
- इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?
- आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.