मुक्तपीठ टीम
राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त भागात दौरे करुन ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे काम करु नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यावेळी शरद पवार यांनी लातूर भूंकप पुनवर्सन कार्याची आठवण करुन दिली. लातूर भूंकपाच्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे ऐकून नरसिंह राव हे दहा दिवसांनी दौऱ्यावर आले होते, अशी आठवण सांगितली.
राज्यावर अशाप्रकारचे संकट आल्यानंतर मी दौऱ्यावर जात असतो. मात्र यावेळी मी देखील दौऱ्यावर जाणे मुद्दाम टाळले आहे. आज राज्यपाल पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात आहेत. पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. मात्र इतर लोकांनी तिथे दौरे करणे टाळावेत असेही शरद पवार यांनी सांगितले.
याशिवाय इतर विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार यांनी समर्पक उत्तरे दिली.