मुक्तपीठ टीम
सध्या ग्राहकांना गॅस सिलिंडर कोणत्याही एका वितरकाकडून घेणे हे बंधनकारक आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडर धारकांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. आता ग्राहक आपल्या इच्छेनुसार वितरक निवडू शकतील. म्हणजेच ग्राहक आपले गॅस सिलिंडर कोणत्याही वितरकाकडून आता रिफिल करु शकतील.
दरम्यान, लोकसभेत काही खासदारांनी एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहक कोणत्याही वितरकाकडून आपला सिलिंडर रिफिल करु शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला असता. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी या नवीन सुविधेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, आता एलपीजी ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार वितरक निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहक स्वत: गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी वितरकाची निवड करु शकतात.
गॅस सिलिंडर पोर्टेबिलिटी सुविधा नेमकी कशी?
- ग्राहक आपल्या नोंदणीकृत लॉगिन, मोबाइल अप किंवा ओएमसी वेबसाइटद्वारे वितरक निवडू शकतात.
- ग्राहक सिलिंडर वितरीत करणाऱ्या वितरकाचे रेटिंग्ससुद्धा पाहू शकतात, त्याआधारावर त्यांना वितरक निवडता येईल.
- यामुळे अयोग्य सेवा देणाऱ्या वितरकाबद्दल ग्राहक सतर्क होऊ शकतात.
- रेटिंगसोबत संबंधित वितरकाची संपूर्ण माहितीही मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर दिली जाईल.
- एलपीजी रिफिलच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना वितरकांच्या यादीतील आपल्या परिसरातील वितरक एका टॅपवर निवडता येऊ शकतो.
- ही सुविधा देशातील काही शहरांमध्ये या आधीच सुरु केली आहे, तर आता ही सुविधा देशभरात लागू करण्याची सरकारची योजना आहे.