मुक्तपीठ टीम
मनपाच्या शाळा म्हटली की डोळ्यासमोर येते अस्वच्छता, सोयीसुविधांचा अभाव. मात्र चंद्रपूरमधील महापालिकेने एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं केलं आहे. शिक्षणाचे दिल्ली मॉडेल राबवत शाळेचं रुप पालटलं आहे. इंग्रजी शाळातील विद्यार्थी प्रवेश घेऊ लागल्यानं मनपा शाळा हाऊसफुल झाली आहे. त्यामुळे आता प्रवेश थांबवण्यात आले आहेत.
सोयीसुविधांचा अभाव, अस्वच्छता याकारणांमुळे कालांतराने मनपाच्या शाळा या बंद पडत आहे. मात्र चंद्रपूरातील या मनपाची शाळा एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो. चंद्रपूर मनपानं विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक नवा मार्ग शोधला आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील ही शाळा. पहिली ते दहावीचे वर्ग इथे भरले जातात. शाळा बाहेरून आणि आतून मनोवेधक आहे. शाळांच्या भिंतींवर प्राण्यांचे चित्र, बसण्याची व्यवस्था नेटकी, पिण्याचं स्वच्छ पाणी, फायर एक्स्टिंग्युशऱ, पंखे आणि शिक्षकांची पूर्ण उपस्थिती असल्यामुळे ही शाळा खासगी शाळा असल्याचा भास होतो. दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर ही शाळा उभी करण्यात आलीय.
या शाळेचा आदर्श इतर मनपा शाळेंनी घेतला
- चंद्रपूर मनपाच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण २९ शाळा कार्यरत आहेत.
- यामध्ये तीन शाळांत तेलुगु, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, २१ शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं.
- यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे.
- त्या सर्व शाळा येत्या काळात अशाच स्वरूपाच्या होणार आहेत.
- या शाळेत डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.
- अजूनही प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत.
- पण आता प्रवेश बंद करण्यात आला आहे.
सध्या कोरोनामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. काही विद्यार्थी हे शाळेत हजेरी लावत आहेत. ज्यांना महागड्या कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा आशेचं किरण आहे.