मुक्तपीठ टीम
२०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शांत झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सक्रिय झाल्या आहेत. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला त्यांनी जोशात सुरुवात केली आहे. गँगस्टर विकास दुबेच्या एनकाऊंटरनंतर राज्यातील ब्राह्मण समाज भाजपावर नाराज असल्याचं बोललं जातं. यापूर्वी एकदा दलित ब्राह्मण समीकरण जुळवून एकहाती सत्ता मिळवलेल्या मायावतींनी त्यावरच काम सुरु केले आहे. त्यांचे चाणक्य सतीश मिश्रांवर ‘मिशन ब्राह्मण’ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याची सुरुवात २३ जुलैपासून अयोध्येतून होणार आहे.
बसपाचे मिशन ब्राह्मण
• उत्तरप्रदेशात दलित २० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.
• बसपासाठी दलित ही त्यांची हक्काची वोटबँक आहे.
• “दलित की बेटी सत्तेवर” म्हटले की दलित मतदार हत्तीचंच बटन दाबतील असा मायावतींचा फॉर्म्युला असतो.
• या २० टक्के मतदारांसोबत उत्तरप्रदेशात १२ टक्क्यांपेक्षा जास्त असणारे ब्राह्मण आले तर मुस्लिम आणि इतर छोट्या जातींचे मतदार असं एक विजयी समीकरण तयार होते.
• बसपाने यापूर्वी सतीश मिश्रांच्या मिशन ब्राह्मणचा फायदा मिळवत या समीकरणाच्या आधारे २००७मध्ये स्वबळावर सत्ता मिळवली होती.
• मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळात कुख्यात गँगस्टर विकास दुबेचे एनकाऊंटर झाले. तसेच ब्राह्मण समाजाला दुखावणाऱ्या इतरही काही घटना घडल्यात.
• त्यामुळे ब्राह्मणहित धोक्यात आणणाऱ्या ठाकूर समाजाच्या योगी आदित्यनाथांपेक्षा आपल्या पाठिंब्यावर सत्तेत येणारी मायावती चालेल, असं बसपाचं सत्ता सूत्र आहे.
ब्राह्मणांना जोडण्यासाठी खुशी दुबेसाठी लढणार बसपा!
• मिशन ब्राह्मण अंतर्गत पक्ष १७ वर्षीय खुशी दुबेसाठी कायदेशीर लढा देणार आहे.
• खुशी दुबे ही अमर दुबे यांची पत्नी आहे.
• अमर हा एनकाऊंटरमध्ये मारला गेलेला गँगस्टर विकास दुबे याचा पुतण्या होता.
• अमर दुबे यालाही पोलिसांनी एनकांटरमध्ये ठार मारले.
• तेव्हापासून खुशी दुबेही गडाआड आहे.
• पक्षाचा ब्राह्मण चेहरा व ज्येष्ठ वकील सतीश मिश्रा अमरची पत्नी खुशी दुबेच्या सुटकेसाठी लढणार आहेत.
खुशीचे प्रकरण का महत्वाचे?
• खुशी एक वर्षापासून बाराबंकीत सुधारगृहात आहे.
• खुशीवर आयपीसीच्या कठोर कलमांतर्गत खून आणि गुन्हेगारी कट रचनेसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
• कानपूर ग्रामीणमधील विशेष न्यायालयासमोर त्याच्या कुटुंबियांनी प्रतिज्ञापत्रात दावा केला होता की, तिला किशोरवयीन मानावे.
• घटनेच्या तीन दिवस आधी लग्न झाले होते. बिक्रू हत्याकांडाच्या फक्त तीन दिवस आधी अमरशी तिचे लग्न झाल्यामुळे या कटात तिची कोणतीही भूमिका नव्हती, परंतु आतापर्यंत खुशीला जामीन नाकारण्यात आला आहे.
• गँगस्टर विकास दुबे, अमर दुबे यांच्या एनकाऊंटरनंतर अमरची सज्ञान नसलेल्या पत्नीला जाणीवपूर्वक गजाआड ठेवल्याचा दावा करत ब्राह्मण समाजात असलेला संताप वाढवण्याची बसपाची चाल आहे.