मुक्तपीठ टीम
यूपीआयद्वारे पैसे पाठवणे आता अददी सोपे होत आहे. आतापर्यंत बँक खाते, यूपीआय आयडी वगैरेची गरज असे. आता मात्र फक्त मोबाइल नंबरचा वापर करुन थेट पैसे पाठवता येणे शक्य आहे. सध्या काही बँकांनी तशी सेवा सुरु केली आहे. लवकरच अन्य बँकाही तशी सुविधा देणार आहेत. त्यामुळे एक लाखापर्यंतची रक्कम झटपट पाठवणे आता सहज शक्य होणार आहे.
आपल्याला मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला पैसे पाठविण्यासाठी, त्यांच्याविषयीची बरीच माहिती आवश्यक असते. यूपीआय अॅपमधून पैसे पाठविण्यासाठी आपल्याकडे मित्राची किंवा कुटूंबातील सदस्याचे बँक खाते किंवा यूपीआय आयडी माहिती असणे आवश्यक असे. परंतु, यापुढे ही माहिती आवश्यक नाही. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँकेने ‘पे टू कॉन्टॅक्ट’ किंवा ‘पे युअर कॉन्टॅक्ट’ सुरू केले आहे. ही सुविधा सुरू झाल्यावर, आता आपण फक्त मोबाइल नंबरद्वारे मित्र किंवा नातेवाईकांना पैसे पाठवू शकाल. यूपीआयमार्फत पैसे पाठवणे अधिक सुलभ झाले आहे. इतर बँकाही येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरू करतील. सध्या एक लाखापर्यंत रक्कम पाठवणे शक्य आहे.
असे पाठवा झटपट पैसे…
- या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पाठवणाऱ्यास बँकेचे अॅप उघडावे लागेल आणि प्रथम “पे टू कॉन्टॅक्ट” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर मोबाइल फोनबुक उघडेल. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीला संपर्कातून निवडता येईल.
- हे केल्याने, बँकेच्या अॅपला संपर्काचा यूपीआय पत्ता आपोआप सापडेल.
- यानंतर पाठवणाऱ्यास फक्त यूपीआय तपासण्याची गरज असेल.
- रक्कम टाकावी लागेल, पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील.
- पैसे प्राप्त करणारी व्यक्ती कोणत्याही अॅपवर असू शकते – फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम.
- बँकेचे अॅप स्वयंचलितपणे यूपीआय पत्ता शोधेल.
बँकांच्या मते, यूपीआयमध्ये नवीन सुविधा सुरू झाल्यावर, पेमेंटची प्रक्रिया करण्यासाठी यूपीआय आयडी किंवा बँक खात्याचा तपशील भरण्याची आवश्यकता नाही आणि वेळ वाचेल. तसेच, आता पैसे हस्तांतरित करणे देखील सोपे झाले आहे. या सुविधेअंतर्गत कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक दररोज ५०,००० आणि आयसीआयसीआय बँकचे ग्राहक १ लाख रुपये हस्तांतरित करू शकतात.