मुक्तपीठ टीम
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पालखी सोहळ्यावर दडपशाही पध्दतीने जाचक प्रतिबंध लादले आहेत. रेल्वे, एसटी, बाजारपेठा सुरु ठेवून फक्त पालखी सोहळ्यावर निर्बंध घालून वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखविण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ किर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांची नजर कैदेतून सुटका करावी. मानाच्या पालखी सोबत किमान दहा वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून सहभागी होण्याची परवानगी द्यावी. या वारकरी सांप्रदायाच्या माफक मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले. याविषयी नागरीकांमध्ये जाऊन जगजागृती करण्यासाठी शनिवारी (१७ जुलै) राज्यभरातील वारकरी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राज्यातील सर्व गावांमध्ये मंदिरांबाहेर, सरकारी कार्यालयासमोर बसून नागरीकांचे प्रबोधन करतील. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचे सरकार जबाबदार राहिल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र, गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी केले.
गुरुवारी (१५ जुलै) चिंचवड गावात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकर बोलत होते. यावेळी वारकरी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज, चिंचवड अध्यक्ष शरद इनामदार, विजयराव देशमुख, विभाग मंत्री नितीन वाटकर, जिल्हा मंत्री संजय शेळके, चिंचवड कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, बजरंग दलाचे विभाग सह संयोजक कुणाल साठे, बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, पुणे ग्रामिण जिल्हा मंत्री दयानंद शिंदे आदी उपस्थित होते.
शंकर गायकर म्हणाले की, मागील वर्षी राज्यातील संतांनी, वारकऱ्यांनी आपल्या धर्मशाळा कोरोना नियंत्रणासाठी शासनाला उपलब्ध करुन दिल्या आणि आता शासनाचे कर्मचारी वीजबील थकले म्हणून या धर्मशाळेंचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. पालकमंत्र्याचे मेळावे, लग्न सोहळे सुरु आहेत. परंतू सातशे वर्षांची वारीची परंपरा खंडीत करुन सरकारने वारकऱ्यांच्या भावना दुखविल्या आहेत. वारकरी शासनाने घातलेले सर्व नियम पाळून, दहा वारकऱ्यांमध्ये रात्री प्रवास करुन, माळरानावर मुक्काम करुन पंढरपूरात विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन, चंद्रभागेत स्नान करण्याची मागणी करीत आहेत. याला परवानगी देण्याऐवजी राज्य सरकार दडपशाही पध्दतीने जाचक नियम टाकून प्रतिबंध करीत आहे. कोरोना काय फक्त वारकऱ्यांमुळेच वाढतो का? असा प्रश्न गायकर यांनी सरकारला विचारला आहे. तसेच आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध मठांमध्ये, मंदिरांमध्ये चार्तुमासनिमित्त पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, किर्तन, प्रवर्चन, दर्शनास असणारे प्रतिबंध दुर करावे. अशीही मागणी गायकर यांनी केली.
वारकरी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज म्हणाले की, सरकारचे मंत्री फक्त राजकारणापुरते संतांचे नाव घेतात. वारक-यांचे कपडे उतरविण्याचे काम हे सरकार करीत आहेत. वारकऱ्यांना नजर कैदेत ठेवून वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखविणाऱ्या या सरकारच्या मुख्यमंत्र्याना पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचा नैतिक अधिकार नाही.
२००६ ला कराडमध्ये जाऊन बंडातात्या कराडकर यांना उध्दव ठाकरे यांनी ‘शिवसेना वारक-यांसाठी काहीही करायला तयार आहे’ असे आश्वासन दिले होते. तेच उध्दव ठाकरे आता मुख्यमंत्री असतानाही बंडातात्यांना नजर कैदेत ठेवतात. हि महाराष्ट्राची शोकांतिका आहे. वारकरी काय आतंकवादी आहेत काय? वारकऱ्यांच्या श्रध्देला आणि भावनेला सरकार आळा घालत असेल तर वारकरी विद्रोह करतील. बंडातात्यांना सन्मानाने नजरकैदेतून मुक्त करावे आणि त्यांना वारी करुन द्यावी. तसेच वारक-यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज यांनी यावेळी केली.
हेही वाचा: महाराष्ट्रात पायी वारीसाठी आक्रमक, उत्तराखंडमध्ये मात्र भाजपा सरकारकडून पारंपरिक कावड यात्रा रद्द!
महाराष्ट्रात पायी वारीसाठी आक्रमक, उत्तराखंडमध्ये मात्र भाजपा सरकारकडून कावड यात्रा रद्द!