मुक्तपीठ टीम
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं वयाच्या ९८ वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते दिलीपकुमार हिंदी सिनेमासृष्टीतील पहिले सुपरस्टार. ट्रॅजडी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे.
दिलीप कुमार यांनी ६३ चित्रपटात काम केलं. सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये ११ डिसेंबर १९२२ साली त्यांचा जन्म झाला.त्याचं मूळ नाव युसूफ खान होतं. परंतु मुंबईत आल्यानंतर दिलीप कुमार म्हणून चित्रपटांमध्ये त्यांची ओळख झाली. त्याच्या नावाच्या बदलाची कहाणीही खूप रंजक आहे.
दिलीप कुमारांचे बालपण खूप त्रासात गेले. त्यांनी पुण्यात कँटिनमध्येही नोकरी केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी वडिलांना कामात मदत करण्यास सुरवात केली आणि त्यांनी उशा विकण्यासही सुरुवात केली ज्यात अयशस्वी ठरले.
नाव बदलण्यामागे वडिलांची भीतीही!
- युसूफ खानना काही काम मिळावे म्हणून त्यांच्या मित्रांचे प्रयत्न सुरु होते.
- त्यांचे मित्र युसूफ खान यांना तेव्हाचं प्रख्यात प्रोडक्शन हाऊस बॉम्बे टॉकीजच्या मालकीण देविका राणी यांना भेटण्यासाठी घेऊन गेले.
- देविका राणी यांना युसूफ खान यांच्या देखण्या रुपात अभिनेत्याचं दर्शन घडलं.
- त्यांनी युसूफ खान यांना चित्रपटांची ऑफर दिली.
- मात्र, त्यांच्या वडिलांना चित्रपटांमध्ये काम करणे अजिबात आवडत नव्हते.
- वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी आपले नाव मोहम्मद यूसुफ खान वरुन दिलीप कुमार असे ठेवले.
वासुदेव की दिलीपकुमार?
- युसूफ खान यांना वडिलांची भीती होतीच, पण तसेही त्यांचे युसूफ नाव आकर्षक नव्हते.
- देविका राणी यांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.
- देविका राणी यांनी अभिनेत्याला नावांची यादी दिली.
- त्यांना ‘वासुदेव’ आणि ‘दिलीप कुमार’ ही नावं आवडली.
- त्यामधील दिलीप कुमार हे नाव निवडलं आणि युसूफ खानचे ते दिलीप कुमार झाले!