मुक्तपीठ टीम
कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येसाठी भाग पाडणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील काहींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साप्तेंना यूनियन नेत्यांनी वसुलीसाठी छळले, त्यांची कामे थांबवली, त्यामुळे ते नैराश्यग्रस्त झाले. त्यातून त्यांना जीवन संपवावं लागलं. त्या प्रकरणी यूनियन नेत्यासोबत भाजपाच्या आमदार राम कदम यांचे छायाचित्र व्हायरल झाले. आज विधानसभेत आमदार नाना पटोले यांनी राम कदम यांच्या नावाचा उल्लेख न करता कारवाईची मागणी केली आहे.
#arrestramkadam #JusticeForRajuSapte pic.twitter.com/GMgyRWNc1I
— सचिन सुरेश सावंत (@camsachinsawant) July 5, 2021
विधानसभेत नाना पटोले यांनी राजेश साप्ते यांच्या आत्महत्येनंतर मुंबईतील फिल्मसिटीत गुन्हेगारी कारवाया सुरु असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अनेक चित्रपट व्यावसायिकांकडून तेथे खंडणी वसुली केली जाते. त्यांना त्रास दिला जातो. आपल्या फिल्मसिटीतून काम दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न सुरु असल्यालाही त्यांनी या घटनाक्रमाशी जोडले. त्यावेळी त्यांनी साप्तेंना छळणाऱ्या यूनियन नेत्याच्या संघटनेत भाजपाच्या आमदार अध्यक्ष असल्याकडेही लक्ष वेधले. राजेश साप्तेंच्या प्रकरणात ज्या भाजपा आमदाराचे नाव पुढे येत आहे, त्याचेही नाव पुढे आले आहे. फिल्मसिटीत व्यावसायिकांकडून अवैध वसूली केली जाते. त्यामुळे अनेक शुटिंग होत नाही. त्यामुळे राजेश साप्तेच्याही प्रकरणात जे गुंड प्रवृत्ती, जी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवृत्ती निर्माण होत आहे, त्यावरही कारवाई झाली पाहिजे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पटोलेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी म्हटले की, या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. चित्रपटक्षेत्रात विनाकारण त्रास देणे, खंडणी वसूल करणे याबाबी राज्यातील चित्रपटसृष्टीसाठी घातक आहेत. त्यामुळे बुधवारी गृहमंत्र्यांच्या दालनात गृहखात्याच्या सचिवांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे.
राजेश साप्ते यांच्या ‘त्या’ व्हिडिओतील अंतिम संदेश
“नमस्कार मी राजेश मारुती साप्ते, मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मौर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.
माझं पुढचं काम राकेश मौर्या सुरू करू देत नाहीत. माझ्याकडे सध्या पाच प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरू करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावा लागला. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला न्याय मिळावा.”