मुक्तपीठ टीम
अहमदनगर मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर- उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेकच अर्ज दाखल झाले. कारण महापौर-उपमहापौर निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे भाजपाला सांगली, जळगाव पाठोपाठ अहमदनगर मनपात महाविकास आघाडीचा मोठा धक्का बसला आहे. बुधवारी या दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल.
२०१९ची चूक राष्ट्रवादीने सुधारली!
• अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २२ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
• या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झालं होतं.
• त्याआधी शिवसेना सर्वात मोठा पक्ष असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते.
• राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपाचा महापौर बसला होता.
• त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांचं नातं उपयोगी ठरलं होतं.
नगरात आघाडीशाही!
• अहमदनगर मनपात सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत.
• शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असं सूत्र ठरलं.
• शिवसेनेच्या वतीने नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता.
• शेंडगे यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते.
• राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौरपदी गणेश भोसले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
• विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे.
• बुधवारी निवडीची अधिकृत घोषणा केली जाईल.