मुक्तपीठ टीम
मुंबईतील एस. एल. रहेजा रुग्णालयानं आयोजित केलेलं लसीकरण शिबिर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या रुग्णालयानं दुर्लक्षित अशा समाज घटकांसाठी लसीकरणाची गरज ओळखून काम सुरु केले आहे. रविवारी त्याचाच एक भाग म्हणून किन्नरांसाठी खास लसीकरण शिबिर आयोजित केले.
सध्याचा काळ संकटाचा. कोरोना महामारी म्हटले की संसर्गाची भीती प्रत्येकालाच असते. त्यात आता अनलॉक सुरु झाल्यानंतर प्रत्येकालाच कामासाठी बाहेर जावे लागते. त्यातही आपली कला किंवा लोकांसमोर दान मागत आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या किन्नरांना नेहमीच लोकसंपर्कात राहावं लागतं. त्यात लसीकरणाचा प्रचार जेवढा झाला तेवढ्या लसी मात्र उपलब्ध नसल्याने मोठीच अडचण. ती लक्षात घेऊन मुंबईतील रहेजा रुग्णालयाने समाजातील वेगवेगळ्या वंचित घटकांसाठी लसीकरण शिबिरं आयोजित केली आहेत. रविवारी तसेच एक शिबिर झाले. किन्नरांसाठी. किन्नरांनी मोठ्या संख्येनं लसीकरणाचा लाभ घेतला. त्यामुळे आता त्यांची प्रतिकारशक्ती वाढून किमान संसर्गाचा धोका बऱ्यापैकी टळणार आहेत.
मुंबईसह देशभरातील इतरही रुग्णालयांनी समाजातील अशा दुर्लक्षित पण आपल्यासारखीच माणसं असणाऱ्या वंचित घटकांसाठी लसीकरणाच्या विशेष मोहिमा राबवण्याची गरज आहे. त्यामुळे समाजालाच फायदा होईल, असे मत डॉ, श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते जोपर्यंत आपण ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण करत नाही तोपर्यंत आपल्या देशातील संसर्गाचा धोका कमी होणार नाही.