मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी एल्गार पुकारला आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजी छत्रपती म्हणाले होते. या आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन निघणार आहे. शाहू समाधी स्थळी हे आंदोलन केले जाणार असून कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी घ्या. कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे म्हणत खासदार संभाजी छत्रपतींच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना कडक नियमावली लागू केली आहे.
ही आहे नियामवली
- सर्वांची वेशभूषा काळ्या रंगाची असावी.
- प्रत्येकाने आपापल्या दंडावरती काळी फीत बांधून येणे.
- प्रत्येकाने काळा मास्क वापरणे.
- पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री घेऊन येणे.
- sanitizer सोबत घेऊन येणे व त्याचा चा वापर करणे.
- आंदोलन स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करु नये.
- कोरोना चे नियम कसोशीने पाळणे. म्हणजे एकमेकांपासून सुरक्षित अंतर वगैरे.
- आंदोलन स्थळी घोषणा देणे टाळावे.
सर्व समाज बंधूंना आग्रह पूर्वक विनंती आहे, की मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चा वेळी आपल्या वर्तनाने जगात आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श घेऊन यापुढेही वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. परंतु आपली ती शक्ती विचारपूर्वक वापरणे काळाची गरज आहे.