मुक्तपीठ टीम
कोल्हापुर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने काही वेगळ्या कल्पनांवर काम सुरु केले आहे. आता जुने दस्तावेज आणि कागदपत्र आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याधुनिक मार्ग स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी फायर बॉलचा वापर केला जाईल. स्वयंचलित अग्निशामक म्हणून हे ‘ऑटो फायर बॉल’ काम करतात. हे ऑटो फायर बॉल जिल्हाभरातील शासकीय कार्यालये आणि दस्तावेज आणि कागदपत्र असलेल्या खोल्यांमध्ये बसविण्यात येतील.
कोल्हापुरातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी दिलेल्य माहितीनुसार, “जुन्या नोंदी, सरकारी कागदपत्रे आणि इतर महत्वाची कागदपत्रे वर्षानुवर्षे रेकॉर्ड खोल्यांमध्ये ठेवली जातात. राज्यभरात अशा प्रकारच्या खोल्या आणि कागदपत्रांच्या खोल्यामध्ये अनेक अपघात घडले आहेत. आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे नष्ट झाले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी आम्ही ‘ऑटो फायर बॉल’ खरेदी केले आहेत. आग लागल्यास हे बॉल ३० सेकंदात फुटतील. ज्यामुळे अग्निशामक ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर एक थर तयार होईल.”
एका ऑटो फायर बॉलची किंमत २००० रुपये आहे. सध्या असे अग्निशामक १५० बॉल्स खरेदी करण्यात आले आहेत. हे बॉल्स जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालये व इतर शासकीय खोल्यांमध्ये बसविण्यात येतील. अग्निशमन दलासाठी ऑक्सिजन सिलिंडर्स आणि मास्क असलेले श्वास घेता येणारे यंत्र घेतले आहेत. या उपकरणांची किंमत प्रत्येकी दीड लाख प्रत्येकी आहे. यामुळे अग्निशमन दलाला मदतकार्य करण्यास मदत होणार आहे.