मुक्तपीठ टीम
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला वर्ष उलटलं. तरी अद्याप सुशांतच्या मृत्यूचा उलगडा झालेला नाही. मागील वर्षी २०२०मध्ये १४ जून रोजी मुंबईतील घरात सुशांत मृतावस्थेत आढळला होता. गळफास घेतलेला असल्याने प्रथमदर्शनी आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पुढे वेगळाच गदारोळ सुरु झाला. आधी बॉलिवूडमधील घराणेशाही आणि मग राजकीय धूमशान सुरु झाले. मुंबई पोलिसांकडून तपास सीबीआयकडे गेला. रिया चक्रवर्तीला अटक झाली. पण त्यातही हत्येचा आरोप नव्हता. पुढे बिहारची निवडणूक उलटली आणि सारंच थंडावलं. आताही तपासात काहीच निष्पन्न झालेलं नाही.
सुशांतच्या मृत्यूनंतर काय घडलं?
- बॉलिवूडमध्ये जेव्हा घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा बर्याच अभिनेता आणि अभिनेत्रींवर निशाणा साधण्यात आला.
- काहींविरोधात समाजमाध्यमांमध्ये हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले.
- पण त्यातील काही सेलिब्रिटींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे सेल्फी व्हायरल होताच, ते ट्रेंड थांबले.
- त्यानंतर मग आरोपांचे केंद्र झाली सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती.
- सुशांतचे वडील केके सिंह यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला.
- त्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
- यापूर्वी मुंबई पोलीस आणि पाटणा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता.
- त्यानंतर हा खटला सीबीआयकडे सोपविण्यात आला.
- एक वर्ष उलटले तरी सुशांतच्या मृत्यूचे गुढ काही उलगडले गेलेले नाही.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील घटनाक्रम
१४ जून
सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये सापडला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. काहींनी त्याच्या मानसिक स्थितीवर भाष्य केले.
१५ जून
कंगनाने सुशांतबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, ‘तो मानसिकदृष्ट्या कमजोर नव्हता. तो रँक होल्डर होता, तो मनाने कमजोर कसा काय असू शकतो? जर आपण त्याच्या काही पोस्ट पाहिल्यास हे स्पष्ट होते की तो आपला चित्रपट पाहण्यासाठी करत होता. त्याला इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नव्हता. इंडस्ट्रीने त्याला का स्वीकारले नाही? ‘
१७ जून
सुशांतसिंग राजपूत यांच्या ‘दिल बेचार’ या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी त्यांचा जबाब नोंदवला.
१८ जून
रिया चक्रवर्ती, सुशांतच्या कुटुंबासह इतर १० जणांची जबानी नोंदविण्यात आली.
२४ जून
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार अभिनेत्याचा मृत्यू “फास लावल्यामुळे” झाला. अंतिम अहवालात असे म्हटले होते की, ‘मृत्यूआधी कोणतीही मारहाण झालेली नव्हती.
७ जुलै
संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. या अहवालात असे म्हटले आहे की भन्साळी यांनी सुशांतकडे चार चित्रपटांसाठी संपर्क साधला होता पण तारखांमुळे तो चित्रपट करू शकला नाही.
१४ जुलै
रिया चक्रवर्तीने सुशांतसोबतचे फोटो शेअर केले.
१६ जुलै
रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
२८ जुलै
सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त, पैशांचा गैरवापर असे आरोप त्यांनी केले.
२९ जुलै
रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि पाटना येथील तिच्या विरोधातील एफआयआर मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी केली.
३ ऑगस्ट
तपासासाठी बिहार पोलिसांनी मुंबई गाठले. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतच्या चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची चौकशी केली.
४ ऑगस्ट
बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
५ ऑगस्ट
केंद्राने बिहार सरकारची मागणी मान्य केली आणि तपास सीबीआयकडे सोपविला गेला. सीबीआयने रिया, तिचे पालक इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती आणि भाऊ सौविक चक्रवर्ती यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला.
७ ऑगस्ट
ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात रिया, सौविक, रियाचा चार्टर्ड अकाउंटंट रितेश शाह आणि तिची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची चौकशी केली.
१८ ऑगस्ट
सुशांतचे वडील केके सिंह यांनी ईडीसमोर आपली जबानी दिली.
२२ ऑगस्ट
सीबीआयची स्पेशल टास्क फोर्स आणि फॉरेन्सिक टीम सुशांतच्या वांद्रे घरी पोहोचली आणि तपास केला. .
२६ ऑगस्ट
सीबीआय आणि ईडीनंतर आता या प्रकरणाच्या चौकशीत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) सामील झाले.
२८ ऑगस्ट
रिया प्रथम चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर झाली. त्याचवेळी ईडीने गोव्यातील व्यावसायिक गौरव आर्य यांची विचारपूस केली.
७ सप्टेंबर
रियाने सुशांतची बहीण प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सुशांतला चुकीची औषध देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
८ सप्टेंबर
तीन दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली.
३ ऑक्टोबर
सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करणार्या एम्सच्या फॉरेन्सिक टीमने दावा केला की ही आत्महत्येची घटना आहे. डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, फास लावण्याशिवाय शरीरावर कोणत्याही जखमाच्या खुणा नव्हत्या.
७ ऑक्टोबर
रिया चक्रवर्ती जामिनावर सुटली.
त्यानंतर आजवर या प्रकरणात सीबीआयने तपास पुढे नेलेला नाही.