मुक्तपीठ टीम
माहसीर हा मासा गोड्या पाण्यातील वाघ म्हणून ओळखलला जातो. तो दिसतोही तसाच पट्टेवाल्या वाघासारखा. एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माहसीरच्या संवर्धनाचे कार्य टाटा पॉवरने ५० वर्षांपूर्वी सुरु केले. हा महाकाय मासा आपल्या पर्यावरणाच्या समतोलासाठी खूपच महत्वाचा आहे. पण त्याचे अस्तित्वच धोक्यात आले होते. निळ्या कल्ल्यांचा माहसीर माशांचे प्रजनन टाटा पॉवरच्या लोणावळा येथील वाळवण मत्स्योत्पादन केंद्रामध्ये केले गेले. त्यातून माशांची ही जात आता आययुसीएनच्या नामशेष होणाऱ्या प्राजातींच्या लाल यादीतून बाहेर आली आहे. आता असे एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त मासे आहेत.
आपल्या पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी हा मासा किती महत्त्वाचा आहे ते टाटा पॉवरच्या खूपच आधी लक्षात आले. त्यातूनच मग ५० वर्षांपासून माशांच्या या प्रजातीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
पर्यावरणाच्या संतुलनासाठी माहसीर इतका महत्त्वाचा का आहे?
हा मासा अतिशय अनोखा आहे, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होणे, पाण्याच्या तापमानातील आणि वातावरणात अचानक होणारे बदल यांचा माहसीरवर पटकन परिणाम होतो. हा मासा प्रदूषण जरा देखील सहन करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण नदीमध्ये काहीही कचरा टाकतो तेव्हा आपण माहसीरच्या गळ्याभोवती तर फास आवळतोच शिवाय गोड्या पाण्याच्या शुद्धतेचा सूचक असलेल्या या जीवाला देखील गमावतो. हे दुहेरी नुकसान आहे.
सध्याच्या महामारीने आपल्याला शिकवलेला आणखी एक धडा म्हणजे प्राण्याची व माशांची अनियंत्रित, बेसुमार शिकार करून आपण आपल्या संपूर्ण अधिवासाचे आणि पर्यावरणाचे नुकसान करत आहोत. यामुळे अनेक रोग एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात, एका पक्षातून किंवा माशातून दुसऱ्यात सहज पसरतात आणि आज तेच आजार मानवजातीचे अपरिमित नुकसान करत आहेत.
माहसीरचे संरक्षण – संवर्धन पर्यावरणासाठी महत्वाचे
माहसीरचे संरक्षण व संवर्धन करणे, त्याची संख्यावृद्धी घडवून आणणे आणि त्याला आययुसीएनच्या लाल यादीतून बाहेर काढणे हे इतके महत्त्वाचे का आहे हे सध्याच्या परिस्थितीत तर वेगळे समजावून सांगण्याची गरजच नाही. पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी, आपली जैव-विविधता जपण्यासाठी आणि या सर्वांमधून मानवजातीच्या रक्षणासाठी हे काम अतिशय महत्त्वाचे आहे. टाटा पॉवरने पन्नास वर्षांपूर्वी जो उपक्रम सुरु केला तो किती महत्त्वाचा आहे आणि तो पुढे तसाच सुरु ठेवणे किती गरजेचे आहे ते आजच्या परिस्थितीत सर्वाधिक जाणवते आहे. जे जग पर्यावरणदृष्ट्या संतुलित आणि आजारांपासून मुक्त राखले जाणे हे आपली जबाबदारी आहे आणि आपल्या मुलाबाळांसाठी तरी आपल्याला ती पार पाडलीच पाहिजे. माहसीरसारख्या अतिशय महत्त्वाच्या प्रजातींचे रक्षण आणि संवर्धन केले गेले तरच ते शक्य आहे.
टाटा पॉवरने माहसीरला सक्षम कसे बनवले?
लोणावळा येथील आपल्या वाळवण मत्स्योत्पादन केंद्रामध्ये टाटा पॉवरने एकाच वेळी ४-५ लाख माहसिर अंडी उबवण्याची एक कल्पक पद्धत विकसित केली. एक शतकभरापासून कार्यरत असलेल्या या कंपनीने इंद्रायणी नदीला बांध घालून एक मोठा तलाव निर्माण केला. याठिकाणी निळ्या कल्ल्यांच्या व सोनेरी रंगाच्या माहसिर प्रजातींचे मासे तलावातील मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनेटेड पाण्याच्या आवाजाने आकर्षित होऊन एकत्र येतात.
ब्रूडर मासा (जो अंडी उत्पादन करण्यासाठी वापरला जातो) इथून गोळा केला जातो आणि अशा तलावांमध्ये सोडला जातो जिथे उंचावरून पाणी पडत असल्याने होत असलेल्या आवाजात पावसाचे किंवा झऱ्यांमधून पाणी पडल्याचा भास होतो. (यामुळे ब्रूडरच्या प्रजनन प्रक्रियेला प्रोत्साहन मिळते)
अनुभवी कोळी एका अतिशय नाजूक आणि कुशल ऑपरेशनद्वारे अंडी व शुक्राणू ब्रूडर्सपासून वेगळे करतात. मग ही अंडी व शुक्राणू यांना फर्टिलायझेशनसाठी एका मोठ्या ब्रीडिंग ट्रेमध्ये ठेवले जाते. याठिकाणी देखील चांगल्या अंड्यांना, जी सोनेरी रंगाची असतात, त्यांना प्राधान्य दिले जाते.
अंडी फर्टीलाइझ झाल्यानंतर (गेल्या ५० वर्षात १५ मिलियन अंडी फर्टीलाइझ झाली आहेत.) ७२-९६ तासांमध्ये माशांची बाळे बाहेर येतात आणि लपण्यासाठी अंधारी जागा शोधू लागतात. सुरुवातीला काहीशी लाजाळू असणारी ही बाळे एका महिन्यानंतर एक सेंटिमीटर लांब होतात आणि वेगाने फिरू लागतात. ४-६ महिन्यात हे मासे देशभरातील विविध मत्स्य विभागांकडे सोपवले जाण्यासाठी तयार असतात, जे त्यांना आपापल्या राज्यांतील झरे व नद्यांमध्ये सोडतात. टाटा पॉवर आणि मत्स्य विभागांदरम्यान हे संपूर्ण काम अतिशय काळजीपूर्वक व सुव्यवस्थित पद्धतीने केले जाते. गेल्या अनेक वर्षात एक कोटी सोळा लाख माहसीर माशांनी भारतभरात आपली घरे निर्माण केली आहेत. ९ फूट लांब व तब्बल ३३ किलोचे वजन असे हे मासे अतिशय आकर्षक आणि विस्मयकारक आहेत.
निळा कल्ल्याचा माहसीर आता अस्तित्व संपत चाललेल्या प्रजातीत नाही!
टाटा पॉवरच्या प्रयत्नांमधून माहरसीरची संख्या वाढली. आययुसीएनने या माहसीरला ‘लीस्ट कन्सर्न’ हे स्टेटस दिले आहे, याचा अर्थ असा की आता या माशाला नामशेष होण्याचा धोका नाही. निळ्या कल्ल्यांच्या माहसीरच्या प्रजननामध्ये आणि त्यांच्या संख्यावृद्धीमध्ये टाटा पॉवरने दिलेल्या योगदानाचा गौरव आययुसीएनने केला आहे.
आता पुढचे आव्हान सोनेरी माहसीरची संख्या वाढवण्याचे!
सोनेरी माहसीर अजूनही त्या यादीमध्ये आहे आणि टाटा पॉवरने पुन्हा एकदा संकल्प केला आहे की सोनेरी माहसीर जोवर लाल यादीतून बाहेर पडत नाही तोवर त्यांची टीम स्वस्थ बसणार नाही.
टाटा पॉवरच्या टीमला आता पहिले यश मिळाले. आता पुढचे लक्ष्य हे सोनेरी माहसीरलाही धोक्याच्या यादीतून बाहेर काढायचे आहे. ते साध्य करण्याच्या टाटा पॉवरच्या प्रयत्नांना टीम मुक्तपीठच्या शुभेच्छा.