मुक्तपीठ टीम
रामभाऊ खांडेकर यांच्या निधनाने कर्तव्यदक्ष आणि निस्पृह अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतराव साठे आणि स्व. नरसिंहराव अशा अनेक नेत्यांचे संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आणि या संपूर्ण कालखंडातील अनुभवांचा समृद्ध ठेवा त्यांनी लेखनरूपाने आपल्याला दिला. त्यांच्याशी माझाही व्यक्तिगत स्नेह होता. त्यांच्या निधनाने एका निस्पृह व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
व्यापक जनसंपर्क आणि समृद्ध अनुभवातून रामभाऊ हे त्या-त्या काळातील नेत्यांचे सल्लागार बनले होते. काम करताना आलेले अनुभव त्यांनी पुस्तकांतून, विविध वृत्तपत्रांतील लेखमालांमधून शब्दबद्ध केले. खरे तर त्या कालखंडातील हा एक मोठा इतिहास आणि संदर्भ सांगण्याचे काम त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांचे स्टेनोग्राफर म्हणून ते रूजू झाले. पण, यशवंतरावांनी संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांना दिल्लीत नेले आणि ते त्यांच्या कुटुंबातील जणू एक सदस्य बनले. केवळ चिकाटी, सातत्य आणि कर्तव्यदक्षतेतूनच एका मोठा प्रवास त्यांनी साध्य केला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.