मुक्तपीठ टीम
पुण्यातील स्वर्गीय नाना पालकर स्मृती समितीद्वारे संचलित सुराज्य सर्वांगीण विकास संस्थेमार्फत एक उपक्रम सध्या गवगवा न करता शांतपणे राबवला जातो आहे. हा उपक्रम आहे, कोरोनाग्रस्त व क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी जेवणाचा डबा घरपोच पुरवण्याचा.
हि सामाजिक संस्था गेल्या २० वर्षापासून येरवडा आणि परिसरामध्ये सेवाकार्य करत आहे. कोरोना काळात संस्थेच्या वतीने सेवावस्तीमध्ये मोफत शिधा वाटप , मास्क वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे , रक्तदान शिबिरे, मयत व्यक्तींचे अंत्यसंस्कार व मयतपास काढून देणे, मोफत लसीकरण नोंदणी असे एक ना अनेक सेवाकार्य प्रकल्पाच्या माध्यमातून अविरतपणे सुरु आहे. अशातच कोरोनाची दुसरी लाट आल्यावर कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले. या परिस्थितीत कोरोनाग्रस्त व क्वारंटाइन असलेल्यांसाठी जेवणाची नीट व्यवस्था होत नाही. काही ठिकाणी महिला वर्गही बाधित असल्याने, स्वतःबरोबर घरातील अन्य सदस्यांची भोजनाची अडचण झाली आहे. दररोज हॉटेलचे जेवण मागवणे देखील शक्य होत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून, घरपोच घरगुती जेवणाचा डबा हा उपक्रम राबवला जात आहे.
कोरोनाग्रस्त व क्वारंटाइन असलेल्या कुटुंबांपर्यंत संस्थेचे कार्यकर्ते मदतीस पोहोचले आहे. गरजेच्या वेळी वेळेत मदत पोहचल्याने अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला. नागरिकांनी बरे झाल्यानंतर संस्थेला संपर्क करून फोनद्वारे अनुभव व्यक्त केले आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास पाचशेपेक्षा जास्त डबे ६३ गरजू कुटुंबांना पोहचले आहेत. पुढील काळात जास्तीत जास्त कुटुंबांना या सुविधेचा फायदा होईल यासाठी संस्था प्रयत्न करत आहे, अशी माहिती सुराज्य प्रकल्पाचे प्रमुख विजय शिवले यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ: