मुक्तपीठ टीम
महिंद्रा ग्रुपमधील स्वराज ट्रॅक्टर्सने ‘मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम’ सुरु केला आहे. देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हा करिअर विकास उपक्रम राबवण्यात येणार असून भविष्यात सक्षम, कुशल इंजिनीयर्स घडावेत हा त्यामागचा उद्देश आहे. करिअरच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असणारे उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक अनुभव पहिल्या वर्षीच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळावेत यादृष्टीने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. कृषी-अभियांत्रिकी शिकवणाऱ्या आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी केले जाणार आहे.
पहिल्या वर्षासाठी स्वराज ट्रॅक्टर्सने देशभरातील आठ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून इंटर्नशिप्ससाठी ३७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना स्वराजच्या अंतिम प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाईल. इंटर्नशिप्सचा भाग म्हणून हे विद्यार्थी प्रत्यक्ष कृषी-यांत्रिकीकरण प्रकल्पांवर काम करतील व त्यांना उद्योगक्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.
स्वराज ट्रॅक्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश चव्हाण यांनी सांगितले, “अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच त्यांना प्रशिक्षण, अनुभव, मार्गदर्शन पुरवून त्यांच्यातून सक्षम, कुशल इंजिनीयर्स घडवावेत आणि त्यांना नव्या युगातील शेतीमध्ये यांत्रिकरणाच्या विविध संधींची माहिती करवून घेण्याची संधी दिली जावी या स्वराजचा उद्देश आहे. ‘मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम’मार्फत आम्ही अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या लायक विद्यार्थ्यांना साहाय्य पुरवू शकू, इतकेच नव्हे तर, त्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात काम करताना आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान यांचा अनुभव देखील मिळवून देऊ.”
‘मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम’मार्फत विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी आर्थिक साहाय्य मिळेल, पण त्यासाठी त्यांची शैक्षणिक कामगिरी सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे.
‘शेतकऱ्याने, शेतकऱ्यांसाठी बनवलेला’ या स्वराजच्या घोषवाक्याला अनुसरून या वर्षी या उपक्रमामध्ये प्रामुख्याने शेतीची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना निवडण्यात आले आहेत.