मुक्तपीठ टीम
गेल्या ३० वर्षांपासून राज्यातील तरुणांना लैगिंक शिक्षण देणाऱ्या गडचिरोली इथल्या सर्च संस्थेनं २६ मे पासून ‘तारुण्यभान’ हा कार्यक्रम यू-ट्यूबवर उपलब्ध करुन दिला आहे. प्रसिद्ध समाजसेविका तथा ‘सर्च’ संस्थेच्या संचालिका डॉ. राणी बंग या स्वत: तरुण, तरुणींना या कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचा उद्देश-
- पद्मश्री डॉ.राणी बंग व त्यांचे सहकारी गेली ३० वर्षांपासून ‘सर्च’ संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध भागांत ‘तारुण्यभान’हा ‘प्रेम, लैंगिकता व प्रजनन’ प्रबोधनाचा कार्यक्रम घेत आहेत.
- तारुण्यभान हा तरुणांपर्यंत लैंगिक शिक्षण पोहोचवणारा उपक्रम आहे.
- अचूक व शास्त्रीय माहिती पोहोचवून तरुण पिढीला योग्य वळण देण्याचं काम या कार्यक्रमातून केले जाते.
- आजच्या तरुणाईने स्व-भान जोपासताना इतर नातेसंबंधांचे संवेदनशीलता आणि जबाबदारीपूर्वक संवर्धन करावे, त्यामुळे तरुणाई अधिक निरोगी व आनंदपूर्ण होईल, तसेच समाजातील लैंगिक गैरसमज, स्वैराचार व अत्याचाराला आळा बसेल, हा त्यामागचा हेतू होता.
- गेल्या ३० वर्षांत सर्चच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वदूर पसरलेल्या जवळपास पाचशे शाळा, महाविद्यालयांमध्ये ५० हजार कुमारवयीन व तरुण मुला-मुलींच्या तीन दिवसीय शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या आहेत.
कार्यक्रमाचा वेळ आणि कालावधी-
- आता हा कार्यक्रम युवांना सुलभरित्या उपलब्ध व्हावा म्हणून ‘निर्माण फॉर यूथ’ या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
- यावर २६ मेपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
- प्रत्येक भाग ३० मिनिटांचा असणार आहे.
- स्त्री प्रजनन अंग, मासिक पाळी,प्रेम व आकर्षण मैत्री, जोडीदाराची निवड , कुटुंब नियोजन, एड्स अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- दर आठवड्याला एक भाग यू-ट्यूबवर उपलब्ध होणार असून, डॉ.राणी बंग स्वत: वैद्यकीय ज्ञान व सामाजिक भान सांभाळून माहिती देणार आहेत.