डॉ. बालाजी जाधव
फडणवीस सरकारने दिलेले फसवे मराठा आरक्षण जे की कोर्टात टिकणारच नव्हते ते शेवटी रद्द झाले. खरं तर लाखोंचे मोर्चे, चाळीस बेचाळीस तरुणांच्या आत्महत्या, शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर सुप्रीम कोर्टाचा असा आलेला निर्णय कोणत्याही समाजातील तरुणांना नैराशेच्या गर्तेत ढकलणाराच असतो. खरेतर मराठा समूह संख्येने प्रचंड मोठा आहे. सर्व पक्षांची आणि सर्व जातीय नेत्यांची वोट बँक म्हणून मराठा समाज सर्वांनाच गरजेचा असतो. उच्चवर्णीय हिंदुत्ववाद्यांना सुद्धा आपला Unpaid Police म्हणून हा समाज हवाच असतो. पुरोगामी लोकांना सुद्धा हा समाज बदलावा आणि त्याने परिवर्तनाच्या मुख्य धारेत यावे आणि चळवळीची शक्ती बनावे असे वाटत असते. पण ज्यावेळी आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळी मात्र सेव मेरिट सेव नेशनच्या नावाखाली उच्चवर्णीय हिंदुत्ववाद्यांनी मराठ्यांना विरोध केला.
ओबीसी समूहातील नेते तर अगोदर पासूनच मराठा आरक्षणाच्या विरोधात होते. काही प्रमाणात मुस्लिम आणि बौद्ध समाज मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाजूचा होता. पण सदावर्ते यांच्या कर्कश्श आकांडतांडवात यांचा आवाज जणू काही क्षीण पडला. म्हणजे सध्या मराठा समाज चहूबाजूंनी एकटा पडला किंवा त्याला एकटे पाडण्यात इथल्या व्यवस्थेला यश आले म्हणा ना.
तशातच सोशल मीडियात मराठे कसे माजलेले, सरंजामी, जातीयवादी, अत्याचारी आहेत अशा आशयाच्या काही पोस्ट्स फिरू लागल्या. तर सेव्ह मेरिटवाल्यांनी आणि ओबीसी समूहाने मात्र आपला आनंद दबक्या आवाजात व्यक्त केला. अर्थात इकडे आपण पराभूत झालो या मानसिकतेतून काही मराठा तरुणांकडूनसुद्धा आगलाव्या पोस्ट्स करण्यात आल्या. पण एकमेकांबद्दल असे संशयाचे वातावरण कुणाच्याही फायद्याचे नसते. याचा फायदा होतो तो राजकीय प्रस्थापिताना आणि इथल्या व्यवस्थेचे लाभधारक असणाऱ्या मनुवाद्यांना.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज आपला इतिहास विसरतो तो आपले भविष्य कधीच घडवू शकत नाही. या पार्श्वभूमीवर मराठा तरुणांना त्यांचा इतिहास विचारला तर हाती काय लागेल हा मोठा प्रश्नच आहे. कोणत्याही मराठा तरुणाला इंग्रजांच्या काळापासून ते अलीकडे झालेल्या दहा मराठा महामानवांची नावे विचारा. किमान पाच तरी नावे सांगतील की नाही याबद्दल संशय आहे. याचे कारण वाचनाचा चिंतनाचा अभाव. (अपवाद आहेत) इतिहास का अभ्यासायचा असतो तर इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्य उज्वलपणे घडवण्यासाठी. आपण ज्यांना प्रेरणा मानतो त्यांच्या सारखे बनण्याची, वागण्याची, तसे आचरण करण्याची मानवी प्रवृत्ती असते. आपण यांचे वारस आहोत म्हटलं की आपल्या मनात एक उत्साह संचारतो आणि आपला आत्मविश्वास कैक पटींनी वाढतो.
मध्ययुगीन इतिहासाबद्दल मराठ्यांना प्रचंड आकर्षण आहे. शिवराय आणि शंभूराजे हे आपल्या जीवनाशी एकजीव झालेली नावे आहेत. पण इ.स. १८१८ ला पेशव्यांनी मराठेशाही संपवली. देशात एकछत्री इंग्रजांचा अंमल सुरु झाला. देशात नव्या विचारांचे वारे वाहू लागले. युरोपियन लोकांमुळे हक्क अधिकार यांची जाणीव होऊ लागली. मध्ययुगीन आचार विचार कालबाह्य होऊ लागले. आणि समाजात आमूलाग्र बदल घडू लागले. हातात तलवार आणि ढाल असणाऱ्या समाजाने आता हाती नांगर धरला. तो शेतीवरच आपली उपजीविका करू लागला. इंग्रजांनी त्यांच्या प्रशासनास मदत लागेल म्हणून काही प्रमाणात इथे शिक्षण सुरु केले. हजारो वर्षांपासून ज्ञान जोपासना ज्यांची परंपरा आहे असा उच्चवर्णीय वर्ग इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजी प्रशासनात आपली पकड जमवू लागला. आणि हे जागृतीचे वारे हळूहळू सर्व बहुजन समाजात पसरू लागले. यात सर्वात महत्वाचा वाटा होता तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा. मराठा समाजातील तरुणही थोड्या का प्रमाणात होईना पण जागृत होऊ लागला. तशातच काळाची पावले ओळखून, शिक्षणाचे महत्त्व ओळखुन जागे झालेले एक व्यक्तिमत्व म्हणजे गंगारामभाऊ म्हस्के यांचे. मी खात्रीने सांगू शकतो कित्येक मराठा तरुणांना या व्यक्तीचे नाव वाचून तर सोडाच पण ऐकूनही माहित नसेल. एवढी आमची इतिहासाबद्दल अनास्था आहे. (अपवाद आहेत) मध्ययुगीन कालखंडानंतर आधुनिक कालखंड सुरु झाला. मध्ययुगीन कालखंडात जसे शिवराय-शंभूराजे-शाहू महाराज- राजाराम महाराज जन्माला आले आणि त्यांनी जसा इतिहास घडवला तसेच आधुनिक कालखंडात सुद्धा शिवराय- शंभुराजे जन्माला आले. शिवराय – शंभूराजे यांनी त्यांच्या काळाला अनुसरून ज्ञानसंपादन करत करत ढाल तलवारीची लढाई केली. तशीच इंग्रजांच्या आधुनिक काळातील शिवराय- शंभूराजे यांनीही ज्ञानसंपादन करत करत लेखणी व पुस्तकांची लढाई केली. फक्त आधुनिक कालखंडातील या शिवराय व शंभूराजांची नावे वेगळी होती.
मराठा आरक्षण गेल्याच्या आणि ठरवून एकटे पाडल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा तरुणांना खरी गरज आहे ती या काळातील शिवराय-शंभूराजे यांना ओळखण्याची. त्यांचे हिमालया एवढे कार्य समजून घेण्याची. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत वर्तमान काळात वाटचाल करण्याची. मध्ययुगीन काळानंतर थेट २०२१ उजाडत नाही तर मध्ये आधुनिक कालखंड लागतो. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ लागते. तसेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लागते. ज्याप्रमाणे शिवराय-शंभुराजेंनी तत्कालीन शाह्याविरोधात ढाल तलवारीचे युद्ध करत महाराष्ट्र निर्माण केला होता त्याचप्रमाणे आधुनिक कालखंडात त्याच शिव शंभुची प्रेरणा घेत शेकडो मराठ्यांनी ज्ञानाची लढाई केलेली आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेणे गरजेचे आहे.
आज मराठा समाजाची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणीक दशा काय आहे हे समजून घेण्यासाठी कोणत्या कोर्टाच्या निर्णयाची गरज नाही. डोळे आणि मेंदू उघडे ठेवून विवेक बुद्धीने पाहणाऱ्या कुणाही सामान्य माणसाला मराठा समाजाची ही दशा कळून येते. इंग्रजांच्या अमदानीत सुद्धा मराठा समाजाची स्थिती काही वेगळी नव्हती. पण समाजाची ही शोचनीय स्थिती लक्षात आली ती वर नामोल्लेख केलेल्या गंगारामभाऊ म्हस्के यांच्या. आता गंगारामभाऊ म्हस्के कोण होते? तर नाशिक जिल्ह्यातील रंगराव ओढे या गावातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. शेतीवर उपजीविका भागत नव्हती म्हणून त्यांच्या वडिलांनी गाव सोडले आणि पुणे गाठले. मोल मजुरी करून मुलाला शिकवले आणि शिक्षणाच्या बळावर गंगारामभाऊ शिरस्तेदार व नंतर मराठा समाजातील पहिले उच्चशिक्षित वकील झाले. त्यांचे राहणीमान, वागणे, बोलणे अगदी उच्चविद्याविभूषित व्यक्तीला साजेसे असे होते. त्यांनी संपादन केलेल्या इंग्रजी ज्ञानाच्या जोरावर एवढी मोठी मजल मारली की महादेव गोविंद रानडे, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सारखी नामवंत मंडळी गंगारामभाऊ कडून वेळोवेळी सल्ले घ्यायची. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कार्य असो की स्वामी दयानंद सरस्वती यांचे व्याख्यान असो की सयाजीराव गायकवाड व राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य असो गंगाराम भाऊ सगळीकडे सक्रिय राहत असत.
उच्चशिक्षण घेऊन केवळ नोकरी आणि कुटुंब करत राहिले असते तरी गंगारामभाऊ ऐषोआरामात जीवन कंठू शकले असते. परंतु त्यांचा मूळ पिंड होता समाजसुधारकाचा. समाजातील दारिद्र्य, अज्ञान, दैना पाहून त्यांना स्वस्थ कधीच बसावेसे वाटले नाही. आणि मग याच चळवळ्या स्वभावातून त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत समाज उभारणीसाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. लोकांसाठी सार्वजनिक बाग असो की सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठीची ड्रेनेज सिस्टीम असो, अल्बर्ट एडवर्ड ग्रंथालय असो की हिराबागेतील टॉऊन सेन्टरची उभारणी असो, दुष्काळात लोकांना मदत करणे असो की सत्यशोधकाना सनातनी लोकांकडून होणारा त्रास असो भाऊ सदैव मदतीसाठी तत्पर असत.
बदलत्या काळानुसार मराठा समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, ज्ञानसंपादन केले पाहिजे, प्रशासनात मोक्याच्या जागा बळकावल्या पाहिजेत अशी भाऊंची सतत तळमळ होती. स्वतः ते एका गरीब कुटुंबातून येऊन देखील पुण्या सारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात प्रस्थापित वकील झालेले होते. परंतु त्याकाळी आजच्या सारखीच उदासीनता शिक्षणाबद्दल दिसून येत होती. इ.स. १८८१ साली झालेल्या जनगणनेत सुद्धा ‘मराठे जात शिक्षणाचे बाबतीत अगदीच मागासलेली दिसून आली’ असा निष्कर्ष निघाला होता. स्वतः गंगारामभाऊ मराठा समाजातील शैक्षणिक उदासीनतेबद्दल म्हणतात, ‘डेक्कनमध्ये मराठ्यांची लोकसंख्या एकंदर लोकसंख्येच्या शे. ५० पेक्षा जास्त आहे. म्हणून जोपर्यंत ही मराठा जात विद्येत इतर पुढारलेल्या जातींबरोबर आली नाही, तोपर्यंत आपली खरी राष्ट्रीय उन्नती झाली, असे कधीच म्हणता येणार नाही.’ पब्लिक सर्व्हिस कमिशन समोर झालेल्या साक्षीत सुद्धा गंगारामभाऊंनी मराठा समाजाला शिक्षणाची आवश्यकता यावर मात मांडल होते. आणि याच कामाला गती देण्यासाठी त्यांनी समाजातील महत्वाच्या लोकांना सोबत घेऊन ‘ डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, पुणे’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा मुख्य उद्देश हा मराठा जातींमध्ये उच्चशिक्षणाचा प्रसार करणे असा होता आणि मराठा समाजातील तरुणांची उन्नती करण्यासाठी जो कुणी झटत असेल त्याला या संस्थेचे सभासद पद मिळत असे. या संस्थे मार्फत गंगारामभाऊ गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असत. सुरुवातीला मदतीचा ओघ कमी असल्याने संस्थेतर्फे कमी विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. परंतु नंतर दस्तुरखुद्द महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या संस्थेला दरवर्षी सुमारे बाराशे रुपयांची मदत सुरु केली आणि संस्थेच्या कार्याला गती आली. मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन झालेली ही सर्वात पहिली संस्था ठरली. त्याचा फायदा असा झाला की मराठा समाजातील जी मुलं अभ्यासात प्रचंड हुशार आहेत पण केवळ पैशा अभावी ते उच्चशिक्षण प्राप्त करू शकत नाहीत अशा गरजू मुलांना शिष्यवृत्ती मिळू लागली. त्यांचे उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागले आणि ब्राह्मण मंडळी बरोबरच मराठा समाजातील तरुण सुद्धा प्रशासनातील महत्वाच्या हुद्द्यावर जाऊ लागली.
राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की प्रशासनात सगळा भरणा हा उच्चवर्णीय जातीतील लोकांचा आहे मराठा-बहुजन समाजातील लोक प्रशासनात नसल्यासारखेच होते. म्हणजे नव्हतेच. तेव्हा शाहू महाराज बहुजन समाजातील उच्चशिक्षित मुले कुठे भेटतील याची चौकशी करू लागले. तेव्हा त्यांना गंगारामभाऊ यांच्या कार्याबद्दल समजले. शाहू महाराजांनी त्यांना पत्र पाठवून चांगल्या अधिकार पदासाठी हुशार व योग्य मुलांची नावे कळण्याची विनंती केली. तेव्हा भाऊंनी महाराजांना दाजीराव अमृतराव विचारे आणि भास्करराव विठ्ठलराव जाधव या दोन होतकरू तरुणांची नावे कळवली. शाहू महाराजांनी दाजीराव विचारे यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून तर भास्करराव जाधवांना सरसुभे म्हणून नियुक्ती दिली. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्रजगद्गुरूपीठ निर्माण केले तेव्हा क्षात्रजगद्गुरू म्हणून ज्या सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची निवड केली त्यांचे शिक्षणही गंगारामभाऊ यांच्या मदतीमुळेच झालेले होते. ज्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य सर्वप्रथम हाती घेतले त्यांचे शिक्षण सुद्धा गंगारामभाऊ यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे झाले. त्यांच्या या महान समाजकार्याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे लिहितात, ‘ गंगारामभाऊ म्हस्के ह्या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत.’
पण दुर्दैवाने आजच्या पिढीला विठ्ठल रामजी शिंदे यांच्याच कार्याचा विसर पडलेला आहे तेव्हा गंगारामभाऊ म्हस्के कोण आहेत हे त्यांना कसे कळणार?
बांधवांनो मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल त्याबत आपण सर्वांनी कायदेशीर लढा चालूच ठेवूया. परंतु समाजातील जो क्रीम वर्ग आहे, ज्यांचे सर्व प्रश्न सुटलेले आहेत, ज्यांच्याकडे मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत अशा लोकांनी गंगारामभाऊ म्हस्के यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत समाजासाठी पुढे यायला हवे. केवळ पैशाअभावी जी मुले उच्चशिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांना परत करण्याच्या बोलीवर का होईना काही ठराविक रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे समाजात दाजीराव विचारे, भास्करराव जाधव, विठ्ठल रामजी शिंदे, पी. सी. पाटील, सदाशिवराव पाटील यांच्या सारखे ज्ञानवीर निर्माण होतील. तर दुसरीकडे मराठा तरुणांनी सुद्धा गंगारामभाऊ म्हस्के यांचे जीवनचरित्र समजून घ्यावे. त्यासोबतच राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, केशवराव जेधे, खासेराव जाधव, दिनकरराव जवळकर, रामचंद्र लाड, ग गो जाधव, क्रांतिसिंह नाना पाटील, तान्हुबाई बिर्जे, ताराबाई शिंदे…. (यादी बरीच मोठी आहे) यांचे कार्यकर्तृत्वही समजून घ्यावे. ते इतरांनाही सांगावे. जीवनात वाचन करण्याची आणि महत्वाची पुस्तके संग्रही ठेवण्याची सवय बाळगावी. कारण दिनेश पाटील म्हणतात तसे, ‘आजच्या मराठा आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वाधिक योगदान देणाऱ्या गंगारामभाऊंचे पुनर्वाचन हे मराठ्यांबरोबर बुद्धिजीवींसाठी अनिवार्य आहे.’
@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद
मो. ९४२२५२८२९०
[ टीप : वरील लेखासाठी संदर्भ म्हणून डॉ राजेंद्र मगर लिखित ‘महानायक गंगारामभाऊ म्हस्के’ या महत्त्वाच्या ग्रंथाची अनमोल अशी मदत झाली. गंगारामभाऊ म्हस्के यांचे बहुमोल कार्य समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हा ग्रंथ विकत घेऊन वाचावा आणि संग्रही ठेवावा. ग्रंथासाठी संपर्क : साकेत प्रकाशन, औरंगाबाद – ९८८१७४५६०४]