मुक्तपीठ टीम
देशात कोरोना संसर्गानं त्रासलेल्या रुग्णांचा गैरफायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात रोजच नव्या तक्रारी समोर येत आहेत. नवा गैरप्रकार आपली मृत्यूसंख्या कमी दिसावी, यासाठी लढवलेल्या शक्कलीचा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये चालणाऱ्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता पालकमंत्री सतेज पाटीलांनी आक्रमक झाले आहेत. कोरोना बाधितांवर आठ दिवस खासगी रुग्णालयात उपचार करूनही जर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसेल तर शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवण्याच्या गैरप्रकारांवर त्यांनी कडक भूमिका घेतली आहे. जर यापुढे खासगी रुग्णालयातील रुग्ण ४८ तासात सरकारी रुग्णालयात दाखल केले तर अशा खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
नेमकं काय घडतंय – काय बिघडतंय कोल्हापुरात?
- कोल्हापूर जिल्ह्यात गेले महिनाभर करोनाचा संसर्ग वाढला आहे.
- काही वेळा सरकारी रूग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध नसतात.
- अशावेळी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात असतात.
- या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
- मात्र, तरीदेखील काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत.
- किरकोळ उपचार करत वेळ घालवतात.
- रूग्णाचा आजार वाढल्यानंतर शेवटच्या क्षणी त्याला सरकारी रूग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या जातात.
- त्यामुळे त्यांचे जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारी रुग्णालयांवर येते, खासगी रुग्णालयं नामनिराळे राहतात.
कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू लपविण्यासाठी खासगी रूग्णालये शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रुग्णाला पाठवत आहेत. त्यामुळे काही रुग्ण दगावत असल्याचे समोर येत आहे. आपल्या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी ही रुग्णालये रूग्णाच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शेवटच्या वेळी रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे आता थेट जिल्हा प्रशासन त्यांना थेट नोटीस काढून कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.