मुक्तपीठ टीम
विधायक संसद आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वसई तालुक्यातील मौजे उसगाव डोंगरी येथील साने गुरूजी संकुलात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘श्रमजीवी रुग्णालयांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच बालकांसाठी अतिदक्षता विभागाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वणगा, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, उप जिल्हा प्रमुख नवीन दुबे, डॉ.आशिष व डॉ. वर्षा भोसले, रोहन गायकवाड यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रमजीवी रुग्णालयाच्या भुमिपूनाप्रसंगी मंत्री एकनाथ शिंदे यांनी विवेक पंडीत आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. “गेल्या अनेक वर्षापासून विवेक भाऊ गोर गरीब आदिवासी बांधवांसाठी समर्पित भावनेतून कार्य करतात, आणि आता कोरोना मुळे निर्माण झालेल्या अशा आणीबाणीच्या काळात ते करत असलेले कार्य हे अतुलनीय आहे. त्यांचे मी सरकारच्या आणि जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो”, अशा शब्दात मंत्री शिंदे यांनी विवेक पंडीत यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच “हे रुग्णालय उभारताना त्यांना जेथे जेथे आवश्यक असेल, तेथे मी साथ देण्यास तयार आहे” असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच लहान मुलांसाठी दोन व्हेंटीलेटर त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेने उसगाव या श्रमजीवी मुख्यालयात १ मे रोजी “श्रमजीवी कोरोना केअर सेंटर” सुरू करण्यात आले. आत्तापर्यंत या कोरोना सेंटरमधून ६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परंतू तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने, व या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांना बसणार असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आदिवासी भागात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात लहान मुलांसाठी समर्पित असलेले असे रुग्णालय असावे या दृष्टीकोनातून श्रमजीवी रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. हे काम खूप मोठे आहे व ते मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय होणार नाही, त्यांनी आजवर केलेल्या सहकार्यातून ही झेप घेत आहोत असेही पंडित यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयासाठी मदतीचे आवाहन करताच अनेक हात पुढे आले व जे रात्रंदिवस या कामासाठी झटतात त्या सर्वांचा उल्लेख केला. तसेच यावेळी त्यांनी जव्हार मोखड्यातील आदिवासी मुलांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. आशिष व डॉ. वर्षा भोसले या दाम्पत्याचा आवर्जून उल्लेख करून पंडित यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
आज झालेल्या रुग्णालयाच्या भूमी पूजनाच्या व अतिदक्षता विभागा च्या उद्घाटन कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, बाळाराम भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, रोहन गायकवाड, फिरोज भाई, सुलतान पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रेंजड यांनी केले, तर प्रास्ताविक स्नेहा दुबे पंडित यांनी केले, तसेच कोरोना सेंटरबाबत माहिती प्रमोद पवार व दिनेश काटले यांनी दिली.