मुक्तपीठ टीम
तहेलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची गोव्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते, असा दावा केला. यानंतर हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. नव्या पिढीसाठी तहेलका, तरुण तेजपाल आणि त्यांच्यावरील आरोप हे कदाचित अनोळखी विषय असतील. त्यासाठीच त्याबद्दल जाणून घेऊया.
तरुण तेजपाल कोण आहेत?
- तरुण तेजपाल मूळचे पंजाबच्या जालंधरचे आहेत.
- त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली आहे.
- तरुण तेजपाल हे १९८०च्या दशकापासूनच पत्रकारितेत आहेत.
- इंडियन एक्स्प्रेस, इंडिया टुडे, फायनान्शियल एक्सप्रेस, आउटलुक यासारख्या प्रसिद्ध वर्तमानपत्रांमध्ये आणि नियतकालिकांत त्यांनी काम केले आहे.
- तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तेजपाल यांनी २००० मध्ये नोकरी सोडली
- ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध बहल यांच्या सहकार्याने त्यांनी तहेलका डॉट कॉम सुरू केली.
- २००४मध्ये तहलका टेबलॉइड नियतकालिक आणि त्यानंतर २००७मध्ये ते मासिक आकारात प्रकाशित होऊ लागले.
- सुरुवातीला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगवर स्टिंग ऑपरेशन करून तहलकाने स्टिंग ऑपरेशन पत्रकारितेचा एका नवा अध्याय रचला.
- दुसर्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी संरक्षण खात्यांशी संबंधित व्यवहारांमधील दलाली उघडकीस आणली.
- त्यानंतर त्यांच्या कार्यालयांवर धाडही घातली गेली होती.
स्टिंग ऑपरेशन, तरुण तेजपाल आणि बलात्काराच्या आरोपाचा तहेलका
- २०१३च्या नोव्हेंबरमध्ये पणजीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तहेलका मासिकाचा ‘थिंक फेस्ट’ हा कार्यक्रम चालू होता.
- या कार्यक्रमाच्या दरम्यान तरुण तेजपाल यांनी आपल्या एका कनिष्ठ सहकारी महिलेचा दोनदा लिफ्टमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला.
- दोनदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणारा मेल पीडितेने मासिकाच्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांना पाठविला होता.
- याबद्दल कोणालाही सांगितलं तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता.
- यानंतर व्यवस्थापनाने तरुण तेजपाल यांच्या वतीने २० नोव्हेंबर २०१३ रोजी कर्मचार्यांना ईमेल पाठवला आणि माफी मागितली, असे सांगितले जाते.
- प्रायश्चित्त म्हणून तेजपाल यांनी सहा महिने स्वत: ला संस्थेपासून वेगळे केले, असे सांगितले जाते.
- नंतर माध्यमांमध्ये हे मेल लीक झाले.
- तशा बातम्या माध्यमात आल्यानंतर गोवा पोलिसांनी आपोआपच दखल घेतली.
- २१ नोव्हेंबर २०१३ रोजी तरुण तेजपाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- तहेलकाने केलेले स्टिंग ऑपरेशन आणि तरुण तेजपाल यांच्यावर गोव्यात दाखल झालेला गुन्हा यात संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला.
- गोवा पोलिस तहेलकाच्या कार्यालयात पोहोचले आणि शोमा चौधरी यांची चौकशी केली.
- ३० नोव्हेंबर रोजी, पणजी न्यायालयाने तेजपालला अटक करण्याचे आदेश दिले. त्यांना अटक करण्यात आली.
- मे २०१४ मध्ये न्यायालयाने त्यांना जामीन दिला आणि तेव्हापासून ते जामिनावर बाहेर आहेत.
- गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत दिली होती.
- आता अखेर न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल जाहीर झाला.
- तरुण तेजपाल यांना न्यायालयाने आरोपांमधून मुक्त केले आहे.