मुक्तपीठ टीम
२०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. गोवा सरकार आता सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. तरुण तेजपाल यांच्यावर एका सहकारी महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सात वर्षांनंतर गोवा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे..
सतत लांबत होती सुनावणी
- सुनावणीच्या तारखा सतत पुढे ढकलण्यात येत होत्या.
- खटला लांबत असल्याने तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
- गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत दिली होती.
- २७ एप्रिल रोजी न्यायालय निकाल जाहीर करणार होते.
- न्यायाधीशांनी या प्रकरणावरील निर्णयाला १२ मेपर्यंत पुढे ढकलले होते.
- १२ मे रोजी पुन्हा हा निर्णय १९ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला
- त्यानंतर १९ मे रोजी ते २१ मेची तारीख ठरवण्यात आली.
काय होते प्रकरण?
- कनिष्ठ सहकारी महिलेने तरुण तेजपाल यांनी दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती.
- गोवा पोलिसांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
- तेजपाल मे २०१४ पासून जामिनावर आहेत.
- त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी २०१४ मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात २,८४६ पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.
तरुण तेजपालांविरोधात लावण्यात आलेली कलमे
तरुण तेजपाल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४२, ३५४, ३५४-ए , ३७६ (२) आणि ३७६ (२) (के) या कलमांतर्गत खटला सुरु होता.
आधीच्या तारखेमुळे नवा वाद
तरुण तेजपाल यांच्या मुलीने न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्यावतीने एक निवेदन वाचून दाखवले. या निवेदनाखाली १९ मे अशी तारीख टाइप केली होती. नंतर ती हाताने खोडून २१ मे करण्यात आली. त्यामुळे तेजपाल यांना दोन दिवसांपूर्वीच निकाल कळला होता का, असा आक्षेप घेण्यात येत आहे. चुकून तारीख आधीची टाइप झाली असे सांगितले जात आहे. पण निकालासाठी न्यायालयाने १९ मे ही तारीख जाहीर केली होती, त्यामुळे आधीच निकाल त्यांना कळला होता, असा वाद निर्माण झाला आहे.
तरुण तेजपालांची निर्दोष मुक्तता झाली…पण सात वर्षांपूर्वीचे ते प्रकरण होते तरी काय? जाणून घेण्यासाठी वाचा: