मुक्तपीठ टीम
गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली आहे. चकमकीत सी-६० पोलीस पथकाने १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यापैकी ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली.
एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-६० पोलीस पथकाने सर्च ऑपरेशन सुरु केले होते.हे ऑपरेशन सुरु असताना पहाटेच्या सुमारास नक्षलवाद्यांबरोबर या कमांडोंची चकमक उडाली.
चकमकीनंतर नक्षलवादी फरार झाले असून पोलिसांनी जंगलातून ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. इतर नक्षलवाद्यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी ग्रेनाईड हल्ला केला. या हल्ल्यात ग्रेनाईडचा स्फोट झाला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस ठाणे उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जाते.