मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरुच असताना रोज मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांना काहीवेळा अडचणींचा सामनाही करवा लागत आहे. त्यातून आता एक मार्ग मिळाला आहे. पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेडने होम आयसोलेशन टेस्टिंग किट तयार केला आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी माय लॅबच्या होम सेल्फ या रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सँपल घेऊन घरच्या घरीच चाचणी करता येईल. यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत.
घरच्या घरी स्वत:च करण्यासाठी किट आणि अॅप आवश्यक
- आयसीएमआरने सांगितल्यानुसार, होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी आहे.
- तसंच असे नागरिक जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असतील.
- होम टेस्टिंग किटने ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने होईल.
- यासाठी गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन अॅप डाउनलोड करावा लागेल.
- मोबाइल अॅपवरुन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.
कोविसेल्फने कशी करायची घरच्या घरी कोरोना चाचणी?
- कोविसेल्फ नावाच्या या किटद्वारा नाकातून सँपल घ्यावे लागेल.
- होम टेस्टिंग करणाऱ्याला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.
- हा फोटो आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.
- यानंतर तो व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे समजेल.
- पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनसाठी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
- लक्षणं असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना आरटी-पीसाआर चाचणी करावी लागेल.
- होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेड मंजूरी देण्यात आली आहे.