मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाविरोधात लढ्याला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ विषाणू शास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोना जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट गटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मार्चमध्येच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल इशारा दिला होता. “मोदी सरकारने शास्त्रज्ञांचे ऐकले पाहिजे” यावर त्यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून खडसावले होते.
भारतामधील कोरोना विषाणूंच्या रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही शास्त्रज्ञांचा हा गट स्थापन करण्यात आला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील हे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोना जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट गटाचे अध्यक्ष होते. त्यांनी अशाप्रकारे तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
डॉ. शाहिद जमील यांनी अध्यक्षपद का सोडलं?
- डॉ. शाहिद जमील यांनी राजीनामा का दिला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
- मात्र कोरोनाबाबत सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते सहमत नव्हते.
- शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी सरकारच्या व्यवस्थेवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता.
- “मोदी सरकारने शास्त्रज्ञांचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी हट्टी वृत्ती सोडावी,” असा सल्ला या लेखात त्यांनी दिला होता.