मुक्तपीठ टीम
भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले गेले असतानाच ती लस शोधणाऱ्या ब्रिटनमध्ये मात्र ते कमी केले आहे. आता ब्रिटनमध्ये कोविशिल्डचा दुसरा डोस ८ आठवड्यांनंतर घेतला जाईल. भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी तसं करताना ब्रिटनच्या वास्तव माहितीचा हवाला देण्यात आला होता. आता ब्रिटननेच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील १२ आठवड्याचे अंतर कमी करून ८ आठवड्यांपर्यंत केले आहे. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या कोणाचे अंतर योग्य, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनुसार, “आज सरकारने कळवले आहे की, कोव्हिड लसीचा दुसरा डोस १२ आठवड्यांऐवजी ८ आठवड्यानंतर दिला जाईल.”
Today the government said COVID vaccine second dose appointments will be brought forward from 12 to 8 weeks.
People should continue to attend appointments and don’t need to contact the NHS. Those who should move their appointment forward will be told when they are able to do so.
— NHS England and NHS Improvement (@NHSEngland) May 14, 2021
भारतात अंतर नुकतेच वाढवले अंतर
भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसींचा तुटवडा यांच्या दरम्यान एनटीएजीआय या सरकारी तज्ज्ञ समुहाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. पूर्वीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविशिल्डच्या दोन डोस दरम्यान सहा ते आठ आठवडे अंतर आवश्यक होते. एनटीएजीआयने असेही म्हटले आहे की, ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल, त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत लस घेऊ नये.
अमेरिकन तज्ज्ञाने अंतर वाढवण्यास योग्य म्हटले
व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फॉसी यांनी एका मुलाखतीत पुढील मत व्यक्त केले होते:
• जेव्हा तुम्ही अतिशय कठीण परिस्थितीत असाल, जी परिस्थिती सध्या भारतात आहे, तेव्हा लवकरात लवकर जास्तीत-जास्त लोकांना लसीकरण देण्याचा प्रयत्न करावा लागेल.
• त्यामुळे दोन डोसमधील अंतर वाढवणे हा माझ्या मते हा एक योग्य दृष्टीकोन आहे.
• लसीच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीकोनातून भारत सरकारचे पाऊलही फायदेशीर आहे.
ऐकायचे कुणाचे, ज्यांनी लस शोधली त्यांचे की जे वापरत नाही त्यांचे?
- भारतीय तज्ज्ञ समुहाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस करताना ब्रिटनमधील वास्तव संशोधनाचा दाखला दिला होता. मात्र आता ब्रिटनच्या आरोग्य सेवेनेच अंतर घटवले आहे.
- अमेरिकन तज्ज्ञांनी जरी दोन डोसमधील अंतर वाढवण्यास योग्य म्हटलं असलं तरी आता ब्रिटननेच ते कमी केल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
- कारण कोविशिल्ड या लसीचे संशोधनच ब्रिटनमध्ये झाले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रोजेनेका यांचे ते संयुक्त संशोधन आहे.
- त्यामुळे जेथे संशोधन झाले त्यांचे ऐकायचे की ज्या अमेरिकेत कोविशिल्ड अद्याप वापरलीच जात नाही, तेथील तज्ज्ञांच्या दुष्टिकोनाला महत्व द्यायचे, असाही मुद्दा चर्चेत आला आहे.