मुक्तपीठ टीम
बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्हांमध्ये दोषी आढळल्यानंतर रोहतक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख, गुरमीत राम रहिम याची बुधवारी संध्याकाळी अचानक तब्येत बिघडली. यामुळे त्याला कडक सुरक्षितेसह रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरमीतमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला इथल्या व्हीआयपी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मात्र, याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. याआधीच आसाराम बापूलाही कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात हलवावे लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहिमची प्रकृती खालावल्याने तुरुंगातील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पीजीआयच्या पथकाला तुरूंगात पाठविण्यात आले. नंतर त्याला रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. राम रहिमला पीजीआयमध्ये हलण्यापूर्वी त्याच्या अवतीभोवती सुरक्षेचा वेढा घालण्यात आला.
डीएसपी शमशेरसिंग दहिया यांच्या संरक्षणाखाली पोलिसांनी त्यांना सायंकाळी ६:१० वाजता तुरूंगातून रुग्णालयात आणले. एमएस कार्यालयाबाहेर थेट रुग्णवाहिका थांबवण्यात आली. राम रहिमला सुरक्षेसह विशेष वॉर्डात ठेवण्यात आले आहे.
राम रहिमवर बलात्काराचे आरोप
- गुरमीत राम रहिम साध्वी बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर रोहतक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
- दोषी ठरल्यापासून गुरमीत राम रहिम २७ ऑगस्ट २०१७ पासून तुरूंगात आहे.
- साध्वी बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहिमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बलात्काराची शिक्षा झालेला आसारामही कोरोनाग्रस्त
- आसारामला २०१८मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
- आसारामने तिच्यावर १५ ऑगस्ट २०१३च्या रात्री बलात्कार केला होता.
- बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आसारामचीही प्रकृती खालावली आहे.
- रुग्णालयात हलवल्यानंतर त्याने आता हरिद्वारला जाऊन आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी दोन महिन्याचा जामिन मागितला आहे.