मुक्तपीठ टीम
कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतातील डबल म्युटंट विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी लसीकरणाचाच मार्ग योग्य असल्याचे म्हटले आहे. हे लसीकरण सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या कोविन अपमुळेच आता लसीकरणात गोंधळ होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यही आपलं स्वतंत्र अॅप लॉन्च करण्यास परवानगीची मागणी करु लागले आहेत.
लसींचा कमी पुरवठा आणि लसीकरणासाठी नोंदणी करण्याच्या कोविन अॅपमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्य स्तरीय अॅपची गरज असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले होते.
राज्यांची स्वतंत्र नवीन अॅपची मागणी
• महाराष्ट्रातून कोविन अॅपवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत.
• महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्याला वेगळ्या अॅपसाठी परवानगी मागितली आहे.
• कोविन अॅपवर नोंदणी करुन बाहेरील राज्यांमधील नागरिक महाराष्ट्राच्या सीमाभागात लसीकरणासाठी येत असल्याचेही आक्षेप काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतले आहेत.
• अलिकडेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही कोविन अॅपवर प्रश्न उपस्थित केले होते.
• त्यामुळे छत्तीसगड समवेत काँग्रेसशासित प्रदेशांमध्येही स्वतंत्र अॅप तयार करण्याची परवानगी मागत आहेत.
• दरम्यान, काही विपक्ष राज्य केंद्राच्या लसीकरणाच्या प्रचार धोरणामुळे अस्वस्थ आहेत.
• तसेच लस प्रमाणापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असण्यालाही आक्षेप आहेत.
• दिल्ली सरकारनेही कोविन अॅपमध्ये त्रुटी असल्याचे विधान केले होते.
• दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्य स्तरीय अॅप तयार करण्याची मागणीही केली होती.
• बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणुकीदरम्यान प्रश्न उपस्थित केले होता.
• त्यांनी म्हटले होते की, “काही राज्ये यासंबंधित थेट बोलण्यास घाबरत आहेत. परंतु त्यांची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे”.
कोविन अॅपमध्ये त्रुटी नसल्याचा दावा
• कोविन अॅपवर अनेक राज्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
• पण केंद्र सरकार मात्र यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही आहे.
• केंद्राचे असे म्हणणे आहे की, कोविन अॅपमध्ये कोणत्याही त्रुटी नसून त्याला उत्तम प्रकारे डिझाइन केले आहे.