मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाच्या भीषणतेमुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना आता महाराष्ट्रातून दूध पुरवले जात आहे. दिल्लीतील लोकांची दुधाची गरज भागवण्यासाठी रेल्वेने खास मिल्क एक्स्प्रेस सुरु केल्या आहेत. त्यातील एक नुकतीच नागपूरहून रवाना झाली. रेल्वेच्या मिल्क एक्स्प्रेसने ४० हजार लीटर दूध दिल्लीला पाठवण्यात आले आहे.
ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी देशभर रेल्वे मोठी भूमिका भूमिका बजावत आहे. रोजच देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन टँकरसह रेल्वेच्या ऑक्सिजन एक्प्रेस जात आहेत. कोरोना रुग्णांना श्वास घेण्यासाठी रेल्वेची गती मदतीस येत आहे. त्यातूनच मिल्क एक्स्प्रेसची कल्पना पुढे आली. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनूप सत्पथी यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. लॉकडाऊन काळात दिल्लीच्या दूध पुरवठा करणारी ही पहिली ट्रेन आहे. रेल्वेमार्फत दूधपुरवठा करण्याचे काम मदर डेअरी करीत आहे. यासाठी त्यांच्या वतीने ९७ हजार रुपये भाडे देण्यात आले आहे.
ही ट्रेन रात्री उशिरा नागपूरहून ६ मे रोजी १२.५५ वाजता सुटली व दुसऱ्या रात्री दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचली. भविष्यातही अशा प्रकारे मदर डेअरी दूध वाहतूक करणार आहे. वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर आशुतोष श्रीवास्तव म्हणाले की, यामुळे नवीन ग्राहक आकर्षित होतील आणि रेल्वेचे उत्पन्नही वाढेल.
पाहा व्हिडीओ: