मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती हालाकीची बनत आहे. देशात राष्ट्रीय लॉकडाऊन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात असताना, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमएने) मोदी सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला चांगलेच खडसावलं आहे. राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाऊन परिणामकारक नसल्याचं सांगत झोपेतून जागे व्हा अशी संतप्त टीका आयएमएने केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी म्हटले आहे की, केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने झोपेतून जागे व्हायला पाहिजे,आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. डॉक्टरांच्या संघटनेने एका प्रसिद्धी पत्रकात असाही आरोप केला आहे की, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने योग्य पावले उचलली नाहीत.
आयएमने एक प्रसिद्धी पत्रक काढलं असून, त्यात आयएमएच्या सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी केंद्र सरकारला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही सल्ला दिला होता. मात्र, तो सरकारने कचराकुंडीत फेकला, असा आरोप संघटनेनं केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जे काही निर्णय घेतले जात आहे. त्यांचा स्थानिक परिस्थितीशी कोणताही संबंध नाही.
आयएमएने आपल्या पत्राद्वारे असे लिहिले आहे की गेल्या २० दिवसांपासून योजनाबद्ध पद्धतीने संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची विनंती संघटना केंद्र सरकारकडे करत आहे. परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आयएमएने म्हटले आहे की, राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाऊन परिणामकारक नाहीत.
उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांना वेळ आणि सुविधा दिल्या जाव्यात, जेणेकरून ते वाढत्या रुग्णसंख्येला योग्य पद्धतीने हाताळतील. जर केंद्र सरकारने त्यांचा सल्ला स्वीकारला असता आणि संपूर्ण लॉकडाऊन लावला असता तर दररोज ४ लाख प्रकरणे नोंदवली गेली नसती.