मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळातही शिवसेना आणि भाजपाचे संबंध कमालीचे तणावाचे राहिले आहेत. रोजच राज्यातील विरोधी पक्ष असणारा भाजपा ठाकरे सरकारवर आक्रमकतेने तुटून पडत असतो. आज मात्र वेगळं घडलं. भाजपाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारला सहकार्यासाठी आभार मानले.
पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधी लढ्याची प्रशंसा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढा अधिक बळकट करण्यासाठी काही अपेक्षाही व्यक्त केल्या. विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
कोरोना संकटातील काही वेगळ्या घडामोडी:
रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”
रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”