मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील भाजपा नेते नेहमीच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपावर टीका करत असतात. मनपाला मुंबईत कोरोना व्यवस्थापन जमत नसल्याचे अनेक वेळा आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयातून आलेली बातमी भाजपाच्या नेत्यांनी ही बातमी कदाचित आवडणार नाही. ही बातमी आहे, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मनपाच्या कोरोना ऑक्सिजन व्यवस्थापन मॉडेलची प्रशंसा केली आहे. तसेच दिल्ली सरकारनेही हा आदर्श ठेवावा असेही सुचवले आहे.
दिल्लीमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी दिल्लीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला ऑक्सिनच्या व्यवस्थापनासाठी ‘मुंबई मॉडेल’ स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाबद्दल गौरवौद्गार काढले आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढत मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केले आहे. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावे, दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असा सल्ला न्यायामूर्ती चंद्रचूड यांनी दिला.
मुंबई महापालिकेकडून शिका!
- मुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगलं काम केलं आहे.
- अशावेळी दिल्लीने काही शिकलं पाहिजे.
- वैज्ञानिक पद्धतीने काम केलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले.
- चार अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही.
- लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही न्यायालयाने सांगितलं.
महाराष्ट्र करू शकतो ते दिल्ली का नाही?
- मुंबई मॉडेल हे काही राजकीय मॉडेल नाही.
- न्यायालयातील अधिकारी हे काही केंद्र किंवा राज्यांचे नाही.
- आपल्याला यातून मार्ग काढला पाहिजे.
- मुंबई महापालिका काय करत आहे, कसे करत आहे? हे जाणून घ्या.
- महाराष्ट्र आता स्वत: ऑक्सिजन पुरवठा करू शकतो.
- ते दिल्ली करू शकत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं.
आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी चर्चा झाली का?
जर दिल्लीचे आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी चर्चा केली असेल, त्यात ऑक्सिजन स्टोरेज टँक कशा तयार करायच्या याची माहिती घेतली असेल तर दिल्लीसाठी हा प्लान कसा राबवणार याची माहिती आम्हाला द्या, अशी विचारणाही न्यायालयाने केली.
हे आहे मुंबई मॉडल
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता.
- यावेळी पालिकेने तातडीने ऑक्सिजनचं नियोजन केलं.
- पालिकेने ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा वाढवली.
- २८ हजार बेड पैकी १२ ते १३ हजार बेडवर ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था केली.
- त्यानंतर पालिकेने ऑक्सिजन सिलिंडरमध्ये बदल करण्यास सुरुवात केली.
- सुरुवातीला पालिका नेहमीच्या ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होती.
- नंतर पालिकेने जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला.
- साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते.
- त्याचबरोबर पालिकेने १३ हजार किलो लीटरची मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केली.
- त्यामुळे रुग्णालये रिफिल मोडवरून स्टोरेज सप्लाय मोडवर आले.