मुक्तपीठ टीम
कोरोना लसींसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मागणीत आली नसल्याच्या बातमीचा केंद्र सरकारने इंकार केला. कोविशिल्ड उत्पादक सीरमला दिलेल्या १७०० कोटींच्या आगाऊ रकमेचा व्यवहारही उघड केला. त्यानंतर सीरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी तातडीने खुलासा करुन मागणी केली नसल्याच्या बातम्यांचा इंकार केला आहे.
सरकारी खुलाशानंतर पुनावालांचा खुलासा आला आहे, हे विशेष! पुनावाला म्हणालेत की, लसींसाठी आगाऊ मागणीच नसल्याच्या बातम्या खोट्या आहेत. २६ कोटी लसींच्या डोसची मागणी केंद्र सरकारने केली होती. सीरमने त्यातील १५ कोटी डोस पुरवले आहेत. त्याच बरोबर सीरम राज्य सरकार व खाजगी रुग्णालयांना ११ कोटी डोस अतिरक्त पुरवणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती आली आहे. त्याचवेळी देशात लसींचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात स्पुटनिकसारख्या परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पूनावाला यांनी देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं लसींची कमतरता भासत असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले अदर पुनावाला-
- ट्विटरवर निवेदनाद्वारे पुनावाला म्हणाले की, अनेक खोट्या बातम्यांदरम्यान लोकांना योग्य माहिती देणे आवश्यक होते.
- अदार पुनावाला यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या अनेक विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.
- लसींच्या तुटवड्याबद्दल बोलताना पूनावाला म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे लस तयार करणे ही एक विशेष प्रक्रिया आहे. लसींचा पुरवठा एका रात्रीत वाढवता येत नाही.
- पुनावाला म्हणाले की, भारताची लोकसंख्या जास्त आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवे.
- अशा परिस्थितीत सर्वांसाठी कोरोना लस तयार करणे हे सर्व सोपे काम नाही.
- आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्येही लसींचा तुटवडा जाणवत आहे.
- या व्यतिरिक्त पुनावाला यांनी सरकारबरोबरचे सामंजस्य कमकुवत करण्याच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिले आहे.
- ते म्हणाले की आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून सरकारशी सामंजस्य राखत काम करत आहोत.
- आम्हाला सरकारकडून सर्व प्रकारचा पाठिंबा मिळाला आहे, मग तो वैज्ञानिक असो, नियमांच्याबाबतीत असो की आर्थिक सहकार्य असो.
- सरकारकडून लसीसाठी नवी मागणी न मिळाल्याच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले आहे.
- पूनावाला म्हणाले, “आतापर्यंत आम्हाला २६ कोटी लसींच्या डोसचे ऑर्डर मिळाली आहेत.
- यापैकी आतापर्यंत आमच्यावतीने १५ कोटी डोस पुरविण्यात आला आहे.
- या व्यतिरिक्त पुढील ११ कोटी डोससाठी सरकारने १,७३२ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली आहे.
- येत्या काही महिन्यांत ११ कोटी डोस आमच्याद्वारे पुरविण्यात येईल.
- त्याशिवाय पुढील काही महिन्यांत राज्य व खाजगी रुग्णालयांना आमच्या वतीने ११ कोटी अतिरिक्त डोसचा पुरवठा केला जाईल.
- पुनावाला म्हणाले की ही लस लवकर दिली जावी अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे.
- आम्ही यासाठी बरेच प्रयत्न करीत आहोत.
- आशा आहे की आपण लवकरच कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू.
Amongst multiple reports it is important that correct information be shared with the public. pic.twitter.com/nzyOZwVBxH
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 3, 2021