मुक्तपीठ टीम
सामायिक वाहतूक क्षेत्रात आपला विस्तार करण्याच्या धोरणात्मक हेतूने, ‘मेरू ट्रॅव्हल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (मेरू) या कंपनीच्या भागधारकांचे समभाग खरेदी करण्यासंबंधी त्यांच्याशी निश्चित करार करण्यात आले आहेत, अशी माहिती ‘महिंद्र अॅंड महिंद्रा लि.’ (एम अॅंड एम) या कंपनीने दिली आहे.
‘ट्रू नॉर्थ’ आणि इतर खासगी इक्विटी गुंतवणूकदारांकडील ४४.१४ टक्के शेअर्स ७६.०३ कोटी रुपयांना, तसेच नीरज गुप्ता व श्रीमती फरहात गुप्ता यांच्याकडील १२.६६ टक्के शेअर्स २१.६३ कोटी रुपयांना ‘एम अॅंड एम’ विकत घेणार आहे. यातून ‘एम अॅंड एम’ची ‘मेरू’मधील हिस्सेदारी ४३.२ टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर जाईल.
‘मेरू कॅब्स’ ही राईड शेअरींगमधील कंपनी २००६ मध्ये स्थापन झाली होती. एका कॉलद्वारे ग्राहकांच्या दारात एसी टॅक्सी उभी राहण्याची सुविधा या कंपनीने उपलब्ध करून दिली व लोकांच्या प्रवासाच्या पद्धतींत एक क्रांती घडविली. भारतात आज, विमानतळांवर ने-आण करण्याच्या व्यवसायामध्ये, ‘राईड हेल’ क्षेत्रात आणि कॉर्पोरेट्सना कर्मचारी वाहतूक सेवा पुरविण्यामध्ये ‘मेरू’चे वर्चस्व आहे.
नीरज गुप्ता हे ‘मेरू’ या कंपनीचे आणि ‘मेरू मोबिलिटी टेक प्रा. लि.’ या तिच्या उपकंपनीचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व पूर्णवेळ संचालक आहेत; तसेच ‘व्ही-लिंक ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस प्रा. लि.’ आणि ‘व्ही-लिंक फ्लीट सोल्यूशन्स प्रा. लि’. या ‘मेरू’च्या इतर दोन उपकंपन्यांचेही ते संचालक आहेत. ३० एप्रिल २०२१ रोजी कामकाज संपल्यावर ते या सर्व पदांवरून पायउतार होतील. अर्थात, ३० जून २०२१ पर्यंत ते कर्मचारी या नात्याने काम सुरू ठेवतील.
प्रवीण शहा हे ‘एम अॅंड एम’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मार्च २०१७ पर्यंत प्रेसिडेंट होते. ते मेरू व तिच्या उपकंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १ मे २०२१पासून सूत्रे हाती घेतील.
‘मेरू’च्या या अधिग्रहणाविषयी महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनीश शहा म्हणाले, “भारतात सामायिक वाहतूक क्षेत्रात एका अग्रणी ब्रॅंडची उभारणी केल्याबद्दल मी नीरज गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. सामायिक वाहतूक क्षेत्रातील आमच्या व्यवसायांची वाढ करण्याच्या हेतूने आम्ही ‘मेरू’शी जोडले गेलेले आहोत. या व्यवसायाची ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास आणि शाश्वत व स्केलेबल व्यवसायाची धोरणे विकसीत करण्यास प्रवीण यांनी सहमती दर्शविली आहे.”
नीरज गुप्ता म्हणाले, “गेल्या दोन दशकांत वाहतूक उद्योगामध्ये ‘मेरू’ची उभारणी करणे आणि देशभरात ती लोकप्रिय होताना पाहणे ही आनंदाची बाब होती. आता एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आणि ‘मेरू’ची सूत्रे महिंद्रा समुहासारख्या देशातील एका समर्थ कॉर्पोरेट उद्योगाच्या हाती सोपविण्याची योग्य वेळ आली आहे. डॉ. अनीश शहा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मेरू येत्या काळात अधिक उंची गाठेल, याची मला खात्री आहे.”