मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाची दुसरी लाट महालाट ठरतेय. अतिवेगाने वाढणाऱ्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही सरकारी व्यवस्था अपुरी पडतेय. या कोरोनाच्या संकटात अनेक दुसऱ्यांच्या मदतीला धावले. कोणी कोरोना सेंटर उभारले तर कोणी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली. परंतु सरकारवर भार न टाकता आपणच आपल्यासाठी सुविधा उभारणाऱ्या एका वेगळ्या गावाची कहाणी आज मांडत आहोत. महाराष्ट्रातील सर्व गावांनी आदर्श घ्यावा असे ते गाव आहे. कोरोना उपचारात पुण्यातील पिसर्वे हे गाव आत्मनिर्भर गाव ठरले आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावात लोकसहभागातून कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे. गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता ती आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी हा प्रयत्न केला आहे. जवळजवळ २५ खाटा असलेले हे आदर्श कोरोना सेंटर लोकसहभागातून सुरू करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पिसर्वे गावचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी, “गावाच्या हक्काच्या स्वत:च्या कोरोना सेंटरच्या स्थापनेमागे संकटकाळात गावासाठी ते उपयुक्त ठरेल, गावकऱ्यांची कुठे फरफट होऊ नये हा हेतू आहे, असे सांगितले.ते पुढे म्हणाले, “पिसर्वे गावात लोकांच्या सहभागातून आणि सर्वांच्या एकीमुळे, सर्वांनी काढलेल्या वर्गणीतून गावातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी आम्ही कोरोना सेंटर सुरू करु शकलो आहोत.”
गावच्या आपल्या कोरोना सेंटरसाठी उपसरपंच अरूणा कोलते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कोलते, अमोल कोलते, महेश वाघमारे, बापूराव कोलते, सुनील कोलते, गणेश कोलते, सुखदेव कोलते, नवनाथ कटके, भानुदास कोलते, अॅड शिवाजी कोलते, मच्छिंद्र कोलते, कैलास कोलते, नितीन कोलते या सर्वांनी खूप परिश्रम घेतले. आताही त्याच्या देखरेखीसाठी गावकरी आवर्जून वेळ काढतात. त्यामुळे पिसर्वे गाव कोरोना उपचारांच्याबाबतीत आत्मनिर्भर ठरलं.
या कोरोना सेंटरमध्ये रूग्णांना मोफत सेवा देण्यात डॉक्टर देविदास नवले त्यांच्यासोबत आरोग्य सेविका दीप्ती दुर्गाडे, आरोग्य सेवक नवनाथ जायभय, सुनील कदम आणि आशा स्वयंसेविका प्रियांका जगताप असा या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.
पाहा व्हिडीओ: