मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शनिवारी ऑक्सिजनसाठीच्या उपकरणांवरील आयातकर व आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रासाठी आठ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या नागरिकांच्या उपक्रमाचा प्रयत्न यशस्वी होईल. प्राणवायूच्या उपलब्धतेसाठी झटपट निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष आणि पीपीसीआरचे समन्वयक उद्योजक सुधीर मेहता यांनी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांसाठी हजारो ऑक्सिजन सिंगापूर येथून मागविण्याची कल्पना मांडली. ही उपकरणे तेथे उपलब्ध असून झटपट आणता येतील, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी पीपीसीआर पुढाकार घेईल आणि सिंगापूर येथील जागतिक गुंतवणूकदार कंपनी टेमासेकच्या सहाय्याने आयात करेल, अशी त्यांनी तयारी दर्शविली. कोरोना रुग्णांना अत्यंत उपयुक्त ठरू शकतील असे 8043 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स मागविण्याची त्यांची योजना आहे. त्यासोबतच बीआयपीएपी या ऑक्सिजन पुरवठ्यासाठीच्या अन्य उपकरणाची सुमारे साडेतीन हजार युनिटही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण यासाठी सर्वात मोठा अडथळा आयातकराचा होता. कोट्यवधींचा आयातकर भरायचा झाला तर हा प्रयत्न सफल होणे अवघड होते.
ते म्हणाले की, ऑक्सिजन उपकरणांची आयात केल्यास त्यावर केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी करात सूट द्यावी, अशी विनंती मा. सुधीर मेहता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल यांना पत्र विनंती पत्र पाठविले. सध्याच्या कोरोनाच्या संकटात नागरिकांकडून चांगला प्रयत्न होत असल्याने त्याला पाठिंबा म्हणून आपणही पंतप्रधानांना पत्र पाठविले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारचा करात सूट देण्याचा निर्णय झाला. ऑक्सिजन उपकरणांची आयात करताना काही प्रशासकीय अडथळा येणार नाही, याची खात्री करण्यासाठी कस्टम विभागातील एका सह सचिवाला विशेष जबाबदारी देण्याचीही सूचना पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत संवेदनशीलतेने व गतीने या बाबतीत निर्णय घेतल्याबद्दल आपण त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचाही आपण आभारी आहोत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीच्या संकटात सरकार व नागरिकांनी सहकार्याने काम करण्याची गरज आहे. पुण्यातील उद्योजकांनी या बाबतीत पुढाकार घेऊन सध्या चालू असलेल्या सेवाकार्यात मोलाची भर घातली आहे.