मेडिकल प्रवेशासाठी घेतलेल्या सुमारे २२ लाख रुपयांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका ठगाला बिहारहून ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. रोशनकुमार सुधाकांत झा असे या ३४ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला बुधवार १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतरांची फसवणुक केली आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
प्रशांत हरनारायण भटनागर हे अंधेरीतील ओशिवरा, तारापोर टॉवर अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांना एक मुलगी असून ती खार येथील पौद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. दहावीनंतर तिने सायन्समध्ये प्रवेश घेतला होता. जून २०१८ रोजी ती बारावीला चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती, तिला मेडीकलमध्येच करिअर करायचे होते, त्यासाठी तिने एमजीएम कॉलेजमध्ये मेडीकलसाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला होता, त्यासाठी तिचे आणि तिचे वडिल प्रशांत भटनागर यांचे प्रयत्न सुरु होते, याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने प्रशांत यांना फोन करुन त्यांच्या मुलीचे एमजीएम कॉलेजमध्ये मेडीकलसाठी प्रवेश करुन देतो असे सांगून कॉलेजचे ट्रस्टी त्याच्या चांगल्या परिचयाचे आहेत, त्यामुळे प्रशांतने रोशनकुमारची भेट घेतली होती. या भेटीत त्याने त्यांना त्यांच्या मुलीला हमखास मेडिकलसाठी प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले, या कामासाठी त्याने त्यांच्याकडून सुरुवातीला बारा लाख रुपये घेतले, त्यानंतर टप्याटप्याने दहा लाख रुपये घेतले होते.
बावीस लाख रुपये घेतल्यानंतरही त्यांच्या मुलीला एमजीएम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दुसरीकडेही प्रयत्न सुरु केले होते, अखेर तिला नवी मुंबईतील डी. वाय पाटील कॉलेजमध्ये मेडीकलसाठी प्रवेश मिळाला. त्यानंतर प्रशांत यांनी रोशनकुमारला ही माहिती सांगून त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती, त्याने त्यांना बारा लाख रुपयांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटताच परत आला नाही. प्रशांतकडून सतत पैशांची मागणी होऊ लागल्याने रोशनकुमार हा मुंबईतून पळून गेला होता.
हा प्रकार निदर्शनास येताच प्रशांत यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात रोशनकुमारविरुद्ध तक्रार केली होती, या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या पथकातील रघुनाथ कदम, विजय वगरे, फुटाणे, रवी पाटील यांनी बिहारला पळून गेलेल्या रोशनकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ट्रॉन्झिंट रिमांडनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते, अपहार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतरांची फसवणुक केली आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, प्रशांत यांच्याकडून घेतलेल्या पैशांची त्याने कुठे आणि कशी विल्हेवाट लावली याचा आता पोलीस तपास करीत आहेत.