मुक्तपीठ टीम
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील भीषण मृत्यूकांडात आपल्या आप्तस्वकियांचे प्राण गमवावे लागल्यानंतर नातेवाईकांचा शोक आणि संताप उफाळून आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासमोर काहींनी आपल्या भावना मांडल्या. एका तरुणाने संतप्त स्वरात विचारले की, रुग्णालयाने आग लागल्यानंतर कुणीही मदतीला नव्हते. जर आमच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर एकाचे जरी हात भाजले असतील तर ते दाखवा! रुग्णालयाचे मालक डॉ. दिलीप शाहंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची आणि त्यांच्या रुग्णालयाला आगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या वसई विरार मनपातील अग्निशमन खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नातेवाईकांनी व्यक्त केलेला संताप
- वसई-विरार मनपाने विजय वल्लभ रुग्णालयाला कोरोना रुग्णालयाचा दर्जा दिला होता, पण या रुग्णालयात तेथे आवश्यक सुविधा नव्हत्या.
- विजय वल्लभ रुग्णालयात डॉक्टर, नर्स नसत.
- आग लागली तेव्हा अति दक्षता कक्षात कुणीच नव्हते.
- गुरुवारी दुपारी एसी नादुरुस्त झाले होते, एक पार्ट काढून रुग्णालयाचा कर्मचारी घेऊन गेला होता.
- एका व्यक्तीने सांगितले की त्यांच्या सासूवर उपचार सुरु होते, त्यांनी दुसरी नर्स तेथे ठेवली, कारण लक्ष दिले जात नसे.
- रुग्णालय चालवणाऱ्या डॉ. दिलीप शाह यांच्यावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशीही मागणी करण्यात येत आहे.
- वसई-विरार मनपातील अग्निशमन दलाच्य अधिकाऱ्यांची चौकशी करून ज्यांनी विजय वल्लभ रुग्णालयाला आगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले त्यांच्यवरही कडक कारवाईची मागणी झाली आहे.