मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. डबल म्युटंटनंतर देशात ट्रिपल म्युटंटचा धोका दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगाल मध्ये ट्रिपल म्युटंटचे काही रुग्ण आढळले आहेत. तर आता ट्रिपल म्युटंट म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, “कोरोना विषाणूचे तीन विभिन्न प्रकार एका नव्या रुपात आढळून येणे”, म्हणजेच ट्रिपल म्युटंट होय.
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचे कारण डबल म्युटंट असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या राज्यांतून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ट्रिपल म्युटंटची लक्षणे आढळली आहेत. या राज्यांमधून १७ नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या अहवालातून ट्रिपल म्युटंट असल्याचे निष्कर्षात समोर आले आहे. आता ट्रिपल म्युटंटच्या एन्ट्रीची बातमी पुढे आल्यामुळे या राज्यांची चिंता आणखी वाढली आहे. ट्रिपल म्युटंटबद्दल एका वैज्ञानिकानी सांगितले आहे की, कोरोना विषाणूचा हा एक गंभीर प्रकार ठरु शकतो. विषाणूच्या या नव्या प्रकराला सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे. तसेच जसे विषाणूंमध्ये बदल होत आहे, तसेच लसींमध्येही बदल करणे आवश्यक आहे’.
जीनोम सिक्वेंसिंग मोठे आव्हान
- भारतासाठी नव्या व्हेरीयंटने संसर्ग होणाऱ्या प्रकरणांची जीनोम सिक्वेंन्सिंग हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
- भारतात आतापर्यंत जेवढी प्रकरणं समोर आली आहेत, त्यातील एक टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणांची जीनोम सिक्वेंसिंग झाली आहे.
- सध्या भारतात १० लॅबमध्ये जीनोम सिक्वेंसिग केले जात आहे.
यामुळे रुग्ण संख्येत वाढ
- डबल म्युटंट विषाणू शोधण्यास उशीर झाल्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली.
- जस जसा विषाणू पसरत जातो, तस तसा या विषाणूंमध्ये बदल होत राहतात.
- भारतात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये डबल म्युटंटची नवी प्रकरणं समोर आली होती.
- तर आता या दोन राज्यांसह बंगालमध्ये ट्रिपल म्युटंटचे नवीन प्रकरणे वेगाने समोर येत आहेत.
किती घातक ट्रिपल म्युटंट?
- ट्रिपल म्युटंट हा प्रकार किती घातक आहे, याबद्दल अद्याप संशोधन झालेले नाही.
- पण डबल म्युटंटच्या संशोधनात असे सिद्ध झाले होते की, हा प्रकार वेगाने पसरत असून यात तरुणांबरोबर लहान मुलांनाही धोका आहे
- डबल म्युटंट हा पहिल्या विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचे सिद्ध झाले आहे.
ट्रिपल म्युटंटबद्दल अधिक संशोधन झाले नसल्याने यावर कोणती लस प्रभावी ठरेल हे सांगणे कठीण आहे, त्यामुळे लसींवर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे ट्रिपल म्युटंटपासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.