मुक्तपीठ टीम
लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेत खिसे भरणाऱ्या गिधाडांनी कोरोना संकटांचा गैरफायदा घेण्यासाठी घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कितीही गरज असली तरीही रेमडेसिविर खरेदी करता कमालीची काळजी घ्या. ऑनलाइन जाहिराती करून गरजूंची जीवघेणी फसवणूक करणारे अनेक भामटे सक्रिय झाले आहेत. मुंबईत अशाच एका घटनेत एका महिलेला रेमडेसिविरच्या नावाखाली पॅरासिटामॉल आणि क्रोसिनची भुकटी विकण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि अपुऱ्या आरोग्य सुविधेच्या तुटवड्यांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र काळाबाजाराचे प्रमाण वाढले असतानाच आता फसवणूकही सुरु झाली आहे. राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असताना एका महिलेची रेमडेसिविर ऐवजी गोळ्यांची भुकटी देऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरमध्ये घडली आहे.
कशी झाली ऑनलाइन फसवणूक?
- घाटकोपरमध्ये एका खासगी रुग्णालयात या महिलेच्या नातेवाईकाला सहा रेमडेसिविर इजेक्शनची गरज होती.
- इजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णालयाने महिलेला इजेक्शन आणण्यास सांगितले.
- महिलेने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती.
- जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधत तिने या सहा कुप्यांची मागणी केली.
- या सहा कुप्यांसाठी तिने ऑनलाइन १८ हजार रुपये ट्रान्सफर केले होते. त्यानंतर महिलेच्या घरी पार्सल आले.
- तिने ते उघडले असता तिला धक्काच बसला, कारण त्यात रेमडेसिविर इंजेक्शनऐवजी पाच कुप्या होत्या आणि प्रत्येक कुपीत रेमडेसिविर नसून औषधी गोळ्यांची भुकटी होती.
- तपासणी केली असता तिची फसवणूक झाल्याचे उघड झाले. तिला पॅरासिटामॉल, क्रोसिन या औषधी गोळ्यांची भुकटी टाकण्यात आलेल्या कुप्या पाठविण्यात आल्या होत्या.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने त्वरित टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.