मुक्तपीठ टीम
कोरोना संसर्ग सर्वत्र उफाळत असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या संख्येत काहीशी घट होत आहे. कोरोना मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आशेची किरणं जाणवत आहेत. आकडेवारीत फार मोठा बदल झाला नसेल, परंतु गेल्या काही दिवसांत सतत वाढत असलेल्या संसर्गाची गती मंदावल्याचे आढळत आहे.
मुंबईत तीन दिवस, घटते नवे रुग्ण
- १८ एप्रिल – ८४६८
- १९ एप्रिल – ७३८१
- २० एप्रिल – ७१९२
मुंबईत गेल्या २४ तासांत ७१९२ रुग्ण आढळले तर ३५ लोकांचा मृत्यू झाला. सोमवारी ७,३८१ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले तर ५७ लोक मरण पावले.
मुंबईत कशी लढतेय कोरोनाशी?
- सध्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढत आहे.
- सक्रिय रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे.
- गेल्या २४ तासांत ९,६४१ लोक बरे होऊन घरी परतले आहेत.
- देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण फक्त ०.०३ टक्के आहे.
- मास्क घालणे, नियमांची कडक अंमलबजावणी आणि इतर उपक्रमांमुळे मृत्यूची संख्या कमी करण्यात मदत झाली आहे.
- फेब्रुवारीच्या मध्यात दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शहरात गेल्या ७० दिवसांत ९५३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
- महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार दुसर्या लाटेत २.६६ लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
- मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरि पेडणेकरांच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या अनेक जागरूकता करणाऱ्या मोहिमेमुळे आणि नियमांची बऱ्यापैकी काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने मृत्यू टाळण्यास मदत होत आहे.