मुक्तपीठ टीम
लसीकरणासाठी आवश्यक ४५ वयोगटात बसत नसतानाही पुतण्या तन्मयने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार नसेल तर लस घेणे चुकीचेच असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी तन्मयला दुसरा डोस देणाऱ्या नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिले आहे की मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मयने पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याने आम्हाला दुसरा डोस द्यावा लागला. त्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की, मुंबई मनपाच्या अख्यतारीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात फडणवीसांच्या पुतण्याला कोणत्या नियमाखाली कोरोना लसीचा डोस देण्यात आला?
पुतण्याने लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण:
- कोरोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नाही.
- कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये.
- तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे.
- त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही.
- जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही.
- जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे.
- पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे.
तन्मयने दुसरा डोस घेतलेल्या नागपुरातील रुग्णालयाचे स्पष्टीकरण
- तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये लसीचा दुसरा डोस घेतला.
- तेथेच त्याने छायाचित्र काढून ते इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.
- वाद झाल्यानंतर त्याने ते छायाचित्र असलेली पोस्ट डिलीट केली होती. या वादाबद्दल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
- तन्मय फडणवीसने आमच्याकडे कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता.
- तन्मयला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही.
- त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला.
तन्मय फडणवीसने पहिला डोस घेतलेले सेव्हन हिल्स कोणाचे?
- तन्मय फडणवीसने पहिला डोस घेतलेले सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबईतील अंधेरी पूर्व भागात आहे.
- सरकारच्या भूखंडावर उभारलेले हे रुग्णालय खासगी संस्था चालवत होती.
- मात्र, तोटा झाल्यानंतर ते बंद झाले. मुंबई मनपाने ते ताब्यात घेतले.
- मुंबई मनपाने कोरोना संकट काळात कोरोना उपचार केंद्र म्हणून वापरत आहे.
- कोरोनावरील चांगले उपचार आणि लसीकरणातील सेव्हन हिल्स रुग्णालयाची कामगिरीचे कौतुक होत असते.
- मात्र, आता तन्मय फडणवीस या २३ वर्षाच्या तरुण कलाकाराला कोणत्या निकषाखाली कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला, यामुळे हे रुग्णालयही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.