मुक्तपीठ टीम
देशभरात कोरोनाची दुसरी लाट भीषण म्हणावी अशी उफाळत आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळणं तर दूरच आता स्मशानभूमीतही जागा मिळत नाही, एवढा कोरोना वेगानं वाढतोय.
मतदानाचे तीन टप्पे बाकी असलेल्या बंगालात निवडणूक प्रचार काळात कोरोना तब्बल २६६३ टक्के वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढच्या तीन टप्प्यातील प्रचार राजकीय नेत्यांनीच आवर घालण्याची मागणी जोर धरत आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सभा रद्द केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्या सभाही रद्द करण्याची मागणी जोर धरत आहेत. कारण त्यांच्या तब्बल ३३ सभा आहेत.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी कोरोना सुरक्षा नियम पायदळी तुडवत केलेला गर्दीतील प्रचारही कोरोना उफाळण्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. उदाहरण म्हणून मतदानाचे तीन टप्पे बाकी असलेल्या बंगालमध्ये निवडणूक काळात उद्रेक झालेल्या कोरोनाचे उदाहरण दिले जाते.
कोरोना देशात नियंत्रणाबाहेर आहे. दररोज २ लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली जात आहेत. देशातील नागरीक घाबरले आहेत. सरकार लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत, परंतु निवणूक प्रचाराच्या नावाखाली सरकार स्वत:च या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे बंगालमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंगालमध्ये येत्या आठ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ६, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या १० आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या १७ प्रचारसभा होणार आहेत.
आता पर्यंत झालेल्या प्रचारसभेमध्ये कोरोना नियमांचा पुरता फज्जा उडवत मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांनी केली आहे. या गर्दीत झालेल्या सभेचे प्राणघातक परिणामही समोर येत आहेत. निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून कोरोनाचा संसर्ग २६००% वाढला आहे. जाणून घेऊया पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील बिघडत्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहेत?
पश्चिम बंगाल
- पाच राज्यांपैकी आता फक्त पश्चिम बंगालमध्येच निवडणुकांचे तीन टप्पे बाकी आहेत.
- पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे प्रचार सभा घेत आहेत.
- या सभेमध्ये लाखोंची गर्दी आहे.
- ९०% लोकांनी मास्क घातलेला नाही. सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन होताना दिसत नाही आहे.
- शुक्रवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. असे असूनही सभेमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
- येत्या ८ दिवसांत मोदींच्या ६, अमित शहांचे १० आणि ममता बॅनर्जी यांच्या १७ सभा होणार आहेत.
याशिवाय इतर नेत्यांच्या बैठका व सभा होत आहेत. - निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या २६ फेब्रुवारी पासून, कोरोनाचा वेग २६६३% वाढला आहे.
- हा वाढ दर २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ७ दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण आकडेवारीवर आधारित आणि या आठवड्यात म्हणजे १० ते १६ एप्रिल दरम्यान सापडलेल्या कोरोनाच्या एकूण आकडेवारीवर आधारित आहे.
- २६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान १२०५ रुग्ण आढळले, तर १० ते १६ एप्रिल दरम्यान ३३,२९७ रूग्ण सापडले.
आसाम
- पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभांना बरीच गर्दी झाली होती.
- फेब्रुवारीमध्ये तेथे ७ दिवसात केवळ ९५ कोरोना रुग्ण आढळत होते, आता आठवड्यातून २,९८२ रुग्ण आढळून येत आहेत.
केरळ
- येथे ६ एप्रिल रोजी निवडणुकीचा गोंधळ थांबला, परंतु आता कोरोनाने हाहाकार माजवला आहे.
- जोपर्यंत येथे निवडणूक होती तोपर्यंत नेत्यांनी बऱ्याच सभा घेतल्या. सभांमध्ये मोठा जमाव जमला. गेल्या एका आठवड्यात येथे ४७,१२८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
तामिळनाडू
- २६ फेब्रुवारीपासून कोरोनाची गती १४५०% वाढली आहे.
- फेब्रुवारीमध्ये दर ७ दिवसांत सुमारे २ हजार रुग्ण आढळले, आता ते थेट ४४ हजारांवर पोहोचले आहे.
पुद्दुचेरी
- साधारणत: दररोज १० ते २० प्रकरणे यायची, परंतु निवडणूक सभेनंतर दररोज ५०० हून अधिक लोकांना संसर्ग होत आहे.
- कोरोनाचा वेग येथे २६३८% ने वाढला आहे. तरीही तेथे बऱ्यापैकी सुरक्षा नियम पाळले गेले आहेत.